विद्यापीठात उभी राहणार सोशल लॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:27 AM2018-04-16T03:27:53+5:302018-04-16T03:27:53+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी असणारे उद्योजक व महिला उद्योजकांसाठी ‘सोशल लॅब’ची उभारणी करण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या लॅबचा वापर करण्यात येणार आहे.
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी असणारे उद्योजक व महिला उद्योजकांसाठी ‘सोशल लॅब’ची उभारणी करण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि नवनवीन संकल्पना मांडण्यासाठी या लॅबचा वापर करण्यात येणार आहे.
जागतिक स्तरावरील या प्रकल्पासाठी युरोपिअन युनियनने १० लाख युरो इतका निधी संमत केला आहे. सोशल इनोव्हेशन फॉर लोकल इंडियन अँड इस्राइली कम्युनिटीज अँड ग्रॅज्युएट आंत्रप्रिन्युअर्स (सिलिस) असे युरोपिअन युनियनने मंजुरी दिलेल्या या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासहित भारतामधील इतर चार संस्थांना सिलिस लॅब उभारण्यासाठी निधी मिळणार आहे. भारतासहित इस्राईलमधील पाच संस्थांचा यामध्ये समावेश आहे. तेल हाई अॅकॅडेमिक कॉलेज या इस्राईलमधील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेसही या प्रकल्पाद्वारे निधी दिला जाणार आहे.
समाजामधील विविध आव्हानांवर नावीन्यपूर्ण उपाययोजनांच्या संकल्पना मांडण्यासाठी लॅब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लॅबच्या माध्यमामधून विचार व संकल्पनांच्या आदान प्रदानास वाव मिळणार आहे. याचबरोबर, सोशल इनोव्हेशन व आंत्रप्रिन्युअरशिप हे दोन घटक केंद्रस्थानी ठेवून नव्या व्यावसायिक संकल्पना मांडता येतील, अशी माहिती या विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. विजय खरे यांनी दिली.
ब्रिटनमधील एडिंबर्ग विद्यापीठ, जर्मनीतील बर्लिन टेक्निकल विद्यापीठ, क्रोएशियातील युनिव्हर्सिटी आॅफ अप्लाईड सायन्सेस आणि पोर्तुगालमधील लिस्बन विद्यापीठ या जगप्रसिद्ध संस्थांनाही सोशल इनोव्हेशनसंदर्भातील संकल्पना मांडण्यासाठी युरोपिअन युनियनकडून आर्थिक पाठबळ दिले जाणार आहे.
या लॅबच्या माध्यमामधून सौरऊर्जा व इतर पर्यायी ऊर्जा संसाधने, स्वच्छ भारत मोहीम आदी प्रमुख आव्हानांना प्राधान्य दिले जा जाणार आहे. यासह इतर क्षेत्रांतील इनोव्हेटिव्ह संकल्पना शोधण्यासाठी विविध स्टार्टअप्सबरोबर काम करण्याची या केंद्राची तयारी असल्याचे विजय खरे यांनी स्पष्ट केले.
इंटरनॅशनल सेंटरमध्ये २० एप्रिल रोजी कार्यशाळा
इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये येत्या १८ एप्रिलला आंत्रप्रिन्युअरशिप यावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाच्या कॉन्स्टंझ गेरहार्ड्स यांचे
व्याख्यान होणार आहे. यामध्ये परदेशातील इतर तज्ज्ञही सहभागी होणार आहेत.