सोशल मीडियाचा अतिवापर घातक : डॉ. तात्यासाहेब लहाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 06:59 AM2017-12-23T06:59:39+5:302017-12-23T07:00:22+5:30
माणसाचे आरोग्य चांगले असेल तर तो जीवनात काहीही करू शकतो. आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे; त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे अहे. हल्ली सोशल मीडियाचा प्र्रामुख्याने तरुणांकडून अति वापर केला जात आहे.
पुणे : माणसाचे आरोग्य चांगले असेल तर तो जीवनात काहीही करू शकतो. आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे; त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे अहे. हल्ली सोशल मीडियाचा प्र्रामुख्याने तरुणांकडून अति वापर केला जात आहे. सोशल मीडियाचा अति वापर आरोग्यासाठी प्रचंड घातक ठरत असून, अनेक आजारांचे ते बळी ठरत असल्याचे मत पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे व्यक्त केले.
पी. एम. शहा फाउंडेशन आयोजित ७ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन लहाने यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी यू.एस.के. फाउंडेशनच्या उषा काकडे, पी. एम. शहा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण कोठडिया, डॉ. विलास राठोड, प्रकाश मगदूम, चेतन गांधी, डॉ. विक्रम काळूसकर उपस्थित होते.
लहाने म्हणाले, ‘‘वयाच्या १२ वर्षापर्यंत डोळ््यांची वाढ होत असते; त्यामुळे या वयातील मुलांनी मोबाईलचा वापर कमी करावा. १ ते ६ वर्षांपर्यंतच्या मुलांना तर मोबाईल दाखवूसुद्धा नये. त्यांच्या नाजूक डोळ्यांवर विपरीत परिणाम होतो. अतिमोबाईल वापर हादेखील आरोग्यासाठी खूप घातक आहे. अलीकडे आहारात खूप मोठे बदल झालेले दिसतात.
हॉटेलमधे जेवायच्या सवयी खूप वाढल्या आहेत; त्यामुळे वेगवेगळे आजार उद्भवू लागले आहेत. देशातील लोक ज्या वेळी अशिक्षीत होते, त्या वेळी २२ टक्के लोक हृदयरोगाने मृत्युमुखी पडत होते; पण आता शिक्षित लोक असताना हृदयरोगाचे प्रमाण ४२ टक्क्यांवर गेले आहे. व्यसन हे तर आरोग्यासाठी सर्वांत घातक आहे. पालकांनी मुलांशी संवाद वाढवायला हवा. पालकांचा मुलांशी असणारा संवाद कमी होताना दिसतो आहे. योग्य आहार, व्यायाम, घरचे जेवण करा आणि आपले आरोग्य उत्तम राखा. पी.एम. फाउंडेशचे हे काम खूप कौतुकास्पद आहे. चित्रपटाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन करीत आहात, ही मोठी गोष्ट असे ते म्हणाले.
उषा काकडे म्हणाल्या, आरोग्यावर चित्रपट महोत्सव होणे ही खूप मोठी आश्वासक बाब आहे. चित्रपटासारखे माध्यम सर्वांपर्यंत पोहचणे व त्यातून जनजागृती होणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे चित्रपट पाहताना मनोरंजन म्हणून नव्हे तर त्यातून बोध घ्यावा.