सोशलमीडियाने गावात घडविला ‘सोशल चेंज’
By admin | Published: April 11, 2017 03:42 AM2017-04-11T03:42:19+5:302017-04-11T03:42:19+5:30
सोशलमीडियावर युवावर्ग ‘टाइमपास’मध्ये मश्गूल असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून येते; मात्र इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील युवकांनी याच सोशलमीडियाचा वापर
- प्रशांत ननावरे, बारामती
सोशलमीडियावर युवावर्ग ‘टाइमपास’मध्ये मश्गूल असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून येते; मात्र इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील युवकांनी याच सोशलमीडियाचा वापर करून गावचा शैक्षणिक कायापालट केला आहे. सोशलमीडियाच्या माध्यमातून गावातील शाळा, आरोग्य केंद्रांसाठी ३२ लाखांची कामे पूर्ण केली आहेत. प्राथमिक शाळा डिजिटल करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता येथील माध्यमिक हायस्कूलकडे युवकांनी मोर्चा वळविला आहे. आता येथील हायस्कू ल डिजिटल करण्यात येणार आहे.
‘सणसर विकास मंच’ नावाने या ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. या सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुपला नुकतेच २६० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत या समूहातील युवकांनी लोकसहभागातून गावच्या नावलौकिकात भर टाकणारी कामे केली आहेत. त्यामध्ये येथील प्राथमिक शाळेची ३० लाख २७ हजार रुपयांची कामे पूर्ण केली आहेत; तसेच आरोग्य केंद्राचे एक लाखाचे काम सुरू आहे.
या युवकांचे काम पाहून बाहेरील अनेक लोक, संस्थांनी विकासकामांना आर्थिक निधी दिला. त्यातून ३० लाखांहून अधिक निधी संकलित होण्यास मदत झाली. सणसरचे काम पाहून आसपासच्या गावांत हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी अनेक लोक गु्रपच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावत आहेत.
राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वजण एकत्रित आले आहेत. या ग्रुपमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांसह, शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायत, सोसायटी सदस्य, तरुण मंडळांसह मजूर वर्गदेखील सहभागी आहे. ‘ज्याला जमेल तशी मदत’ या तत्त्वावर सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. साधारण ३२ लाख रुपयांची कामे सर्वांच्या सहयोगामुळे पूर्ण झाली आहेत. सर्वांनी गावातील आरोग्य आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित केले आहे.
...चौथीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ
विद्यापीठाच्या धर्तीवर प्रथमच येथील जिल्हा परिषद शाळेतील ४ थीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्र म राबविला जाणार आहे. मंगळवारी (दि.११) पदवीदान कार्यक्रम होणार आहे. गावातील युवकांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होणार आहे. देशात प्रथमच असा कार्यक्रम होणार असल्याचा दावा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर भोईटे यांनी केला आहे.
..नो गुडमॉर्निंग...
नो गुडनाइट प्लीज
‘सणसर विकास मंच’च्या व्हॉट्सअप ग्रुपवर केवळ शाळा, विद्यार्थी, गावच्या विकासाच्या गप्पांना, सूचनांना प्राधान्य देण्यात येते. इतर निरर्थक संदेश पाठविण्यास ग्रुपवर मनाई आहे. गुडमॉर्निंग, गुडनाईटचे संदेश पाठविल्यास त्यास समज देण्यात येते.