सामाजिक जाणिवेने भारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ‘भाई ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:37 PM2018-11-22T17:37:01+5:302018-11-22T17:39:19+5:30
संवेदनशील लेखकाबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून पुलंची वेगळी ओळख होती. त्यात त्यांना सुनीताबाईंची देखील महत्वपूर्ण साथ मिळाली..
पुणे : केवळ लेखनातून नव्हे तर प्रत्यक्षात समाजात फिरुन तळागाळातील पीडितांच्या चेह-यावर आनंद फुलविण्याचे काम पुलंनी केले. त्याकरिता सामाजिक भावनेतून मोठ्या स्वरुपात त्यांनी मदत केली. अनेक संस्थांना देणग्या देवून त्यांचे कार्य अखंडित सुरु राहावे यासाठी प्रयत्नशील राहिले. संवेदनशील लेखकाबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून पुलंची वेगळी ओळख होती. त्यात त्यांना सुनीताबाईंची देखील महत्वपूर्ण साथ मिळाली, अशा शब्दांत विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांनी ’’भाईं’’च्या सामाजिक व्यक्तिमत्वाचे पैलु उलगडले.
पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि स्क्वेअर १च्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवात गुरुवारी झालेल्या 'पुलंचे सामाजिक भान' या विषयावरील परिसंवादाचे. या परिसंवादात डॉ. अनिल अवचट, गिरीश प्रभुणे आणि रेणू गावस्कर सहभागी झाले होते. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून डॉ. मंदार परांजपे यांनी आमटे कुटुंबियांचे प्रतिनिधी या नात्याने पुलंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. परिसंवादापूर्वी बालगंधर्व कलादालनात दाखविण्यात आलेल्या फिल्म डिव्हीजन्स निर्मित 'पु.लं' या लघुपटाचा रसिकांनी आस्वाद घेतला.
गावस्कर म्हणाल्या, सुनीताबाईंना एकदा एका खेड्यातून एका मुलाचे पत्र आले. 'आम्हाला शाळेतून काढून टाकतात, शेतात पाठवतात, कारखान्यावर पाठवतात', असे त्या मुलाने लिहिले होते. तेव्हापासून पन्नास पैशांची शाळा आणि शंभर रूपयांची शाळा अशी दरी पुलं आणि सुनीताबाईंना अस्वस्थ करून गेली. त्यामुळेच या दांपत्याची वेदना कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे सतत वाटत रहाते. आपल्याला बरेच काही करता आले पण जे करता आले नाही, त्यात लहान मुलांना गाणे शिकवता आले नाही, अशी खंत पुलंना वाटत होती. प्रभुणे म्हणाले, पुलंना भेटण्याची मला प्रचंड ओढ होती. ते पुण्यात आल्यानंतर बरेचदा मी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. पण पुलंच्या लेखनात व्यत्यय नको, म्हणून कर्तव्यदक्ष सुनीताबाईंनी मला परत पाठवले. त्यानंतर माजगावकरांच्या माणूसचा एक विशेषांक मी काढला होता आणि त्यात 70-80 पानांचा एक लेख लिहिला होता. तेव्हा पुलंनी स्वत:हून माझी माहिती काढून मला घरी भेटायला बोलवले होते.* पुलंची ओळख ही एका तीव्र मतभेदातून झाल्याची आठवण डॉ. अवचट यांनी सांगितले. ते म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवरील झोपडपट्टया हटवून त्याठिकाणी रंगंमदिर उभारले पाहिजे, यासाठी पुलं आग्रही होते. त्यांच्या या भूमिकेला माझा विरोध होता. त्याविषयी साधना साप्ताहिकात दीर्घ लेख देखील लिहिला होता. पण कालांतराने आमच्यातील मतभेद दूर झाले आणि पुलं माझे आईबाप बनले. मतभेदाच्या काळातील कटूता कणभरही मनात न ठेवता त्यांनी आपलेसे केले. पुलं आणि सुनीताबाई प्रचंड हळवे होते. मुक्तांगणचा जन्म त्यांच्याच प्रेरणेने झाला.