विद्यापीठातून सामाजिक एकता पेरावी
By Admin | Published: April 27, 2017 05:21 AM2017-04-27T05:21:30+5:302017-04-27T05:21:30+5:30
देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही.
पुणे : देशभरात असहिष्णुता वाढत असून, अतिरेकी धर्मांधता फोफावत आहे. अशा द्वेषाच्या पायावर देश महासत्ता कदापि होऊ शकणार नाही. याविरोधात लढण्याची वेळ आली असून, विद्यापीठांतून सामाजिक एकतेची बीजे पेरली जावीत, असे मत ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
कात्रज येथील भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या २२ व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, प्रसिद्ध विनोदी साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार, फिजिशियन आणि समाजसेवक डॉ. विनोद शहा, माजी कुलगुरु डॉ. एस. एफ. पाटील यांना भारती विद्यापीठ विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठ विश्वविद्यालयाचे संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह विश्वजित कदम, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, माजी कुलगुरू उत्तमराव भोईटे, कुलसचिव जी. जयकुमार उपस्थित होते.
काळे म्हणाले, ‘‘भौतिक ज्ञानाच्या विकासावर देश महासत्ता होणार नाही, त्याला सांस्कृतिक संचिताचीही जोड देणे गरजेचे आहे. खरे तर सामाजिक हेतू नसणारे ज्ञान हे व्यर्थच असते. आज त्या ज्ञानात जातीयतेचे हिरवे, भगवे आणि निळे रंग मिसळले जात आहेत. आपल्या धर्माच्या अतिरेकी प्रेमावर आणि इतर धर्माच्या अविवेकी द्वेषावर या देशाच्या महासत्तेची इमारत उभी राहू शकणार नाही. देशात असहिष्णुता वाढत असून, सत्तेसाठी धर्माचे राजकारण केले जात आहे. त्याविरोधात लढण्याची वेळ आली आहे.’’