राज्यातील समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलन करणार; तीन महिन्यापासून वेतन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 10:01 PM2021-11-29T22:01:52+5:302021-11-29T22:02:05+5:30
ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचा-यांना वेतन न दिल्याने त्यांची दिवाळीही अंधारातच गेली. त्यामुळे समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रात आहेत
पुणे : एसटी कामगारानंतर आता राज्याच्या समाज कल्याण विभागांतर्गत कार्यरत असणारे सर्व कर्मचारी काही महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने अस्वस्थ आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचा-यांना वेतन न दिल्याने त्यांची दिवाळीही अंधारातच गेली. त्यामुळे समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रात आहेत,असे सूत्रांनी सांगितले.
समाज कल्याण विभागाचे शासकीय वसतिगृह, निवासी शाळा तसेच विभागात कार्यरत असणारे शिक्षक व लिपीक संवर्गातील कर्मचारी तसेच विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, संगणक ऑपरेटर या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन वेळेवर केले जात नाही. राज्याचे समाजकल्याण मंत्री व आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेकडो कर्मचा-यांची दिवाळी देखील अंधारातच गेली. कर्मचा-यांचे वेतन कधीच वेळेवर होत नसल्याने कर्मचा-यांनी आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह कसा? चालवायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.
समाज कल्याण विभागाचे आयुक्त एकीकडे सांगतात कर्मचा-यांचे वेतन वेळेवर करा तसे परिपत्रक निर्गमित करतात मात्र त्यांच्या कार्यालयातूनच निधी राज्यभरात क्षेत्रीय कार्यालयांना वेळेवर वितरित केली जात नाही, ही बाब संगणकीय प्रणालीमुळे कर्मचारी यांच्या निदर्शनास आली आहे. परिणामी दोन- तीन महिन्याचे वेतन थकित राहते. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पगारसाठी कर्मचा-यावर सामाजिक न्याय विभागात अन्याय होत असेल, तर न्याय तरी कोणाकडे मागायचा? असा प्रश्न कर्मचा-यांकडून उपस्थित केला जात आहे.