सामाजिक कामाला प्रतिष्ठा हवी - भरत वाटवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:15 AM2018-09-26T03:15:10+5:302018-09-26T03:15:28+5:30

समजामध्ये लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते.

 Social work needs prestige - Bharat watwani | सामाजिक कामाला प्रतिष्ठा हवी - भरत वाटवानी

सामाजिक कामाला प्रतिष्ठा हवी - भरत वाटवानी

Next

पुणे : समजामध्ये लाखो मनोरुग्ण वेदना, जखमा घेऊन जगत आहेत, त्यासाठी समाजात जागृती होण्याची गरज आहे. जसा मधुमेह, रक्तदाब होतो, तसा मानसिक आजार कुणालाही होऊ शकतो; पण ते मान्य करण्याची कुणाची तयारी नसते. यातून समस्या जटिल होतात. याला समाज जबाबदार नाही तर त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा दृष्टिकोन कारणीभूत आहे. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सामाजिक कामाला प्रतिष्ठा मिळणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवाणी यांनी व्यक्त केले.
पूना सिटीझन डॉक्टर फोरमतर्फे डॉ. भरत वाटवाणी यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मंदा आमटे, डॉक्टर अरुण गद्रे उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे व शारदा बापट यांनी डॉ. वाटवानी यांची मुलाखत घेतली.
भरत वाटवानी यांनी सांगितले, देशातील एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोक स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये महिला आणि पुरुषांचे प्रमाण सारखेच आहे. पण एकूण व्यवस्थेमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त प्रमाणात घराबाहेर पडत असल्यामुळे स्किझोफ्रेनियामुळे विपन्नावस्थेत रस्त्यावर फिरणारे पुरुष जास्त आढळून येतात. तर उलटपक्षी स्किझोफ्रेनियाग्रस्त महिला मात्र घरात असल्यामुळे त्यांच्या आजाराविषयी फार वाच्यता होत नाही. मी या आजाराविषयीचे सेवा केंद्र दहिसर येथे सुरू केले, त्यावेळी त्या परिसरातील लोकांनी मला खूप विरोध केला. ते माझ्या विरोधात न्यायालयातदेखील गेले. आजही मानसिक व्याधींचा स्वीकार आपल्याकडे खुलेपणाने केला जात नाही, याचेच हे द्योतक म्हणावे लागेल. समाज मनोरुग्णांना स्वीकारायला तयार नसल्याने त्यांच्यावरील उपचार, त्यांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
समाजामध्ये देणगी देणारे खूप लोक आहेत; परंतु त्यांचा मानसिक आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही पूर्वग्रहदूषित आहे. अनेक जण शिक्षण, महिला सबलीकरण यासाठी देणगी देतात; परंतु आजही समाजामध्ये मानसिक आजार याबद्दल जनजागृती होण्याची गरज आहे, असे वाटवानी यांनी सांगितले. समाजाच्या विविध घटकांसाठी झोकून देऊन काम करणारे आमटे कुटुंबीय हीच माझ्या कार्याची प्रेरणा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सामाजिक कार्यात करुणा हा महत्त्वाचा धागा

करुणा हा समाजसेवकाच्या मनाचा स्थायीभाव असतो. तेच त्याच्या कार्याची प्रेरणा असते. बाबांच्या मनात हीच प्रेरणा जागृत झाल्याने आनंदवन
आणि हेमलकसा यासारखे प्रकल्प उभे राहिले.
करुणा हाच दोन समाजसेवकांमधील समान धागा असतो. वाटवानींसारख्या भारावलेल्या तरुणांमुळे बाबा खूप प्रभावित व्हायचे.
करुणा आणि इतर
लोकांबद्दल वाटणारे दु:ख जर संपले तर तुमच्यातील सामाजिक कार्यकर्ता ही
संपून जातो, असे प्रकाश आमटे यांनी सांगितले.

Web Title:  Social work needs prestige - Bharat watwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.