मेट्रोच्या कास्टिंग यार्डसाठी ३२ वृक्षांची विनापरवाना कत्तल केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 09:44 PM2019-02-28T21:44:22+5:302019-02-28T21:52:50+5:30
डेक्कन काँलेज अभिमत विद्यापिठाच्या आवारात मेट्रोच्या कास्टिंग यार्डसाठी ३२ वृक्षांची विनापरवाना कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला.
पुणे : डेक्कन काँलेज अभिमत विद्यापिठाच्या आवारात मेट्रोच्या कास्टिंग यार्डसाठी ३२ वृक्षांची विनापरवाना कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय आगरवाल यांनी केलेल्या तक्रारीनुसार वृक्ष प्राधिकरण विभागाने त्वरीत पंचनामा करुन विनापरवाना वृक्षतोड करणार्यांविरुध्द कार्यवाही सुरु केली आहे.या गंभीर प्रकरणी विनापरवाना वृक्षतोड करणार्या संबधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी उपमहापौर डाँ.सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पुणे मेट्रोच्या कास्टिंग यार्डसाठी डेक्कन काँलेज अभिमत विद्यापिठाच्या आवारातील जागा भाडेतत्त्वावर मिळावी अशी मागणी मेट्रोच्या वतीने एका खाजगी कंपनीने केली होती. त्याबाबतचा करार विद्यापीठ व्यवस्थापण व सदर कंपनी यांच्यामध्ये शुक्रवारी करण्यात आला. कास्टिंग यार्डसाठी डेक्कन काँलेज आवारातील केवळ जागा वापरण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे.कास्टिंग यार्डच्या कामासाठी च्या आवश्यक सर्व परवानग्या संबधित कंपनीने घेऊनच पुढिल कामाला सुरुवात करणे अपेक्षित होते.मात्र केवळ यार्डची जागा ताब्यात घेतल्यावर सदर कंपनीने कोणत्याहि परवानग्या न घेता कामाला सुरुवात केली.गंभीर बाब म्हणजे आवारातील ३२ वृक्ष विनापरवाना छाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला.सामाजिक कार्यकर्ते संजय आगरवाल यांनी याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती.त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समितिचे वृक्ष निरीक्षक राजेश चिवे यांनी याठिकाणी तोडलेल्या पंचनामा केला.
सदरचा पंचनामा व अहवाल येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी विजय लांडगे यांना पाठविण्यात आला असून त्यांच्यामार्फत महापालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.संबधित कंपनीने कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना ३२ झाडे तोडल्याची माहिती यावेळी वृक्ष निरीक्षक चिवे यांनी दिली. केवळ कास्टिंग यार्ड उभारण्यासाठी जागेची परवानगी घेऊन डेक्कन काँलेज आवारातील झाडांची कत्तल करण्याचा प्रकार धक्कादायक आहे.डेक्कन काँलेज अभिमत विद्यापीठ आवारात कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड करणार्या संबधित कंपनीवर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी उपमहापौर डाँ.सिद्धार्थ धेंडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.