'बंद करा, बंद करा, 'तुला पाहते रे' बंद करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 02:49 PM2018-11-27T14:49:46+5:302018-11-27T15:06:19+5:30
‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
पुणे - झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय असून, टीआरपीचे अनेक विक्रम मोडत आहे. विक्रांत सरंजामे आणि ईशा निमकर यांची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. परंतु या मालिकेला आता काही जणांनी विरोध दर्शवला आहे. ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
‘तुला पाहते रे’ या मालिकेतून समाज प्रबोधनाचं कोणतंही कार्य होत नाही आहे. तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विदारक चित्र या मालिकेतून दाखवण्यात आल्याचाही आरोप प्रदीप नाईक यांनी केला आहे. विक्रांत सरंजामे व ईशा निमकर यांची रोमँटिक केमिस्ट्री ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या विक्रांत आणि ईशाच्या प्रेम कहाणीत बरेच चढउतार येत आहेत. विक्रांतचा शत्रू जालिंदर याच्या एण्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. हा जालिंदर विक्रांतविरोधात ईशाला भडकावण्याचाही प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेत पुढे काय घडणार, हे जाणून घेण्याची फार उत्सुकता लागून राहिली आहे. तर दुसरीकडे ही मालिका महाराष्ट्रासाठी घातक असल्यामुळे बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.