समाजहितैषी नटसम्राट काळाच्या पडद्याआड...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:00 AM2019-12-18T05:00:16+5:302019-12-18T05:00:50+5:30
गोरा रंग, घारेपणाकडे झुकलेले चमकदार डोळे, हाफ बाह्यांचा साधाच रंगीत झब्बा, पांढरा पायजमा आणि गालावरचा तो मस. बोलताना थरथरणाऱ्या गालाबरोबर तोही उठून दिसतो. अभिनयाचा मानदंड ठरलेल्या नटसम्राटाचे हे वास्तवातील चित्र. त्याच्यातील सामाजिक भान उलगडून दाखवणारे.
स्वातंत्र्यपूर्व काळ, वडील डॉक्टर, काँग्रेसचे पुण्यातील नामवंत पुढारी. इतके मोठे, की घरी महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजाजी असे मान्यवर येऊन गेलेले. पैसा, मानसन्मान, प्रतिष्ठा वगैरे सर्व काही.
मुलगाही वडिलांच्याच पावलावर पाऊल टाकून डॉक्टर झाला. कान, नाक, घशाचा तज्ज्ञ. त्याचीही प्रॅक्टिस चांगलीच चाललेली. मनात आणले असते, तर तोही पुण्यातील एक प्रसिद्ध, प्रतिष्ठित, मान्यवर अशी ख्याती प्राप्त करता झाला असता.
पण, मग तुम्ही आम्ही सगळेच अभिनयाच्या एका मानदंडाला मुकलो असतो. यशाच्या शिखरावर असतानाही समाजभान जागृत ठेवणाºया विचारवंताला पारखे झालो असतो. नाटक, चित्रपटाच्या मोहमयी दुनियेत राहूनही तळातल्या माणसांची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी काही करता येते, हे आपल्याला समजलेच नसते.
ही गोष्ट आहे, डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू नावाच्या एका माणसाची. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ नावाचे एक अनघड नाटक डॉक्टरांनी काही वर्षांपूर्वी केले. विवेकाची कसोटी लावून आपले संपूर्ण आयुष्य जगणाºया सॉक्रेटिसची भूमिका आयुष्यभर विवेकाचा जागर करणाºया डॉक्टरांच्या वाट्याला यावी, हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. आवडली व विचारांच्या कसोटीवर पटली, तरच भूमिका स्वीकारायची, हा विचार एक व्रत म्हणून डॉक्टरांनी कायम पाळला. विचारांशी, तत्त्वांशी तडजोड कधी केली नाही. त्यातूनच मग एका नटसम्राटाबरोबरच तर्कनिष्ठ, समाजाचे भले कशात आहे, याची चिंता करणारा व योग्य आहे ते बोलणारच, असे ठामपणे सांगणारा, सांगितल्यानंतर त्याच्याशी प्रामाणिक राहणारा एक विचारवंतही आकाराला आला. एका हत्याकांडातील खुन्यांची फाशी माफ करावी किंवा ‘परमेश्वराला रिटायर करावे’ अशा त्यांच्या काही भूमिकांवरून वाद झाले. ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाचा प्रयोग एका राजकीय नेत्याला दाखवण्याच्या प्रकारात तर त्यांनी थेट विजय तेंडुलकर यांना दोष दिला. सेन्सॉर बोर्डाशी सामना केला. या सगळ्याची किंमत त्यांना अनेकदा चुकवावी लागली; पण त्याला घाबरून आपली मते मात्र त्यांनी कधीही बदलली नाहीत.
पुण्यात बी. जे. महाविद्यालयात शिकत असतानाच ते नाटक, एकांकिका करू लागले. अभिनयातून आपल्याला आनंद मिळतो आहे हे उमजले, तोपर्यंत ते डॉक्टर झालेही. सगळ्याच वडिलांची असते तशीच त्यांच्याही वडिलांची अपेक्षा होती, की आता मुलाने छान प्रॅक्टिस करावी. त्यांनी नाटक वगैरे करावे, हे त्यांना अजिबातच आवडत नव्हते. पण, ‘अभ्यास करतोय ना, मग चालू द्या,’ असा विचार करत त्यांनी दुर्लक्ष केले. आता मात्र त्याने ते सगळे सोडावे व आपला दवाखाना व्यवस्थित चालवावा, असे त्यांना वाटत होते. डॉक्टरांनी ते केलेही; पण नाटक बंद न करता.
त्यासाठी मग डॉक्टरांनी किती तरी प्रयास केले. म्हणजे सुरुवातीला पी.डी.ए. तिथेच त्यांनी भालबा केळकर यांना आपल्यातील चुणूक दाखवून दिली. मग तिथे थोडे मतभेद झाल्यानंतर थेट मुंबईत रंगायन. मधल्या काळात इंग्लंड, आफ्रिका अशी वारी झाली. नाटक या माध्यमाचा अभ्यास तिथेही सुरूच होता. तिथेच त्यांच्या लक्षात आले, की नाटक केल्याशिवाय आपण राहू शकणार नाही. मुंबईत विजया मेहता, विजय तेंडुलकर, सत्यदेव दुबे यांच्याशी त्यांचा संपर्क आला. त्यांनाही वाटले, अरे हा कोण नवा सुशिक्षित नाट्यकलावंत! व यांनाही वाटले, अरे, हे तर आपलेच सहप्रवासी! मग नाळ जुळली. डॉक्टर शनिवारी रात्री पुण्यातून मुंबईला जायचे, रविवारी दिवसभर नट म्हणून तालमी करायचे व सोमवारी सकाळी पुन्हा डॉक्टर म्हणून दवाखान्यात हजर राहायचे. न कंटाळता, न थकता त्यांना हे सगळे करता आले, ते बहुधा अभिनय नावाचा गुण रक्तात भिनला गेल्यामुळेच.
अभिनयाचीच नाही, तर विचारांचीही गुणवत्ता त्यांनी अल्पावधीतच दाखवली. डॉक्टरांच्या आधीचा नाटक आणि काही प्रमाणात चित्रपटांतीलही अभिनय म्हणजे ‘बघाच, आता मी कशी अॅक्टिंग करून दाखवतो’ असा! अशोककुमार, मोतीलाल हे हिंदी चित्रपटातील अभिनेते मात्र याला अपवाद होते. तसा वास्तववादी अभिनय डॉक्टरांच्या आवडीचा. अभ्यासाने त्यांनी तो विकसित केला. ‘रायगडाला जाग येते’मधील ‘संभाजी’सारख्या भूमिका त्यांना व्यावसायिक रंगमंचावर सुरुवातीला मिळाल्या. भूमिकेची गरज म्हणून त्यांनी त्या जुन्या ऐतिहासिक आवेशात केल्याही. पण, तरीही त्यांनी स्वत:ची म्हणून एक वेगळी जोड त्या संभाजीला दिलीच. त्याचबरोबर ‘काचेचा चंद्र’सारखे व्यावसायिक प्रयोग व प्रायोगिक रंगभूमीवरील एकांकिका, नाटक यांतील भूमिका सुरूच होत्या. एक प्रयोगशील, अभ्यासू कलावंत म्हणून डॉक्टरांचे नाव होऊ लागले. पात्राचे स्थलकालपरिस्थितीनुरूप विश्लेषण, त्यावरून त्याच्या चालण्या, बोलण्या, वागण्याची संगती व नंतर अभिनयात त्याचा परिपोष यांमुळे डॉक्टरांच्या विविध भूमिकांमधून रंगमंचावर अभिनयाचा एक नवाच, देखणा व अवाक करणारा आविष्कार दिसू लागला. नवनवीन भूमिका त्यांच्याकडे चालत आल्या व त्यांनी त्याचे सोने केले.
‘नटसम्राट’मधील अप्पासाहेब बेलवलकर व डॉक्टर यांचे एक अतूट नाते आहे. या भूमिकने त्यांना यशोशिखरावर नेले. वृद्धांच्या अनेक भूमिका नंतरही त्यांच्या वाट्याला आल्या. पण, ‘नटसम्राट’ने जे केले, ते त्यानंतर झाले नाही. आवाजाचे आरोह, अवरोह, डोळ्यांमधील चमक, हातवारे अशा अनेक गोष्टी डॉक्टरांनी या बेलवलकरांना जोडल्या व ती व्यक्तिरेखा अजरामर केली. भूमिकाच इतकी जबरदस्त आहे, की कोणीही केली, तरी ती वाईट होऊच शकणार नाही, असे डॉक्टर आजही अत्यंत विनम्रपणे सांगतात. मात्र, कुसुमाग्रजांच्या शब्दांना त्यांनी अभिनयाचे जे कोंदण चढवले, त्याला तोड नाही. त्यांच्यानंतरही अनेकांनी या भूमिकेत रंग भरले. मात्र, अप्पासाहेब बेलवलकर म्हणजे डॉक्टरच, असेच आजही रसिक प्रेक्षक समजतात. त्यानंतर ‘हिमालयाची सावली’, ‘अग्निपंख’ वगैरे बºयाच नाटकांमधून वृद्ध व्यक्तिरेखा डॉक्टरांना मिळाल्या. त्याही गाजल्या.
पण, ही फार नंतरची गोष्ट. त्याआधी रंगभूमीवर बºयापैकी नाव होऊ लागले असतानाच दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची नजर या उमद्या, अभ्यासू व अभिनय ही एक गंभीर गोष्ट आहे, असे मानून काम करणाºया कलावंतावर पडली. त्यांनी डॉक्टरांना ‘पिंजरा’ या चित्रपटातील मास्तरच्या भूमिकेबद्धल विचारले. एक नवा अनुभव घेऊ, या विचाराने डॉक्टरांनी होकार दिला. त्यांनी स्वत: तर हा अनुभव घेतलाच, पण चित्रपटांतही नाटकासारखाच राणा भीमदेवी थाटाचा अभिनय होत असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीलाही वास्तववादी अभिनयाचा एक नवा धडा दिला. ध्येयवादी व नंतर अध:पतित झालेला, तरीही विवेक शाबूत असलेला मास्तर त्यांनी असा वठवला, की भारतातच नाही, तर परदेशांतही त्याची वाहवा झाली. (चित्रपटाच्या हिंदी वृत्तीतही डॉक्टरच होते.)
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे यांमुळे डॉक्टरांना किलकिलेच झाले नाही; तर सताड उघडले गेले. एखादा कलावंत असता, तर त्याने उखळ पांढरे करून घेतले असते. पण, डॉक्टरांनी दोन्हींकडे मोजक्याच भूमिका स्वीकारल्या. ‘इन्कार’, ‘लावारीस’, ‘दो और दो पाँच’ वगैरेंसारखे तद्दन व्यावसायिक हिंदी चित्रपटही त्यांनी केले. पण, थोडे बारकाईने बघितले, तर त्यातही त्यांनी अभिनयाच्या अनेक छटा आणल्याचे दिसते. मराठीतही ‘हीच खरी दौलत’, ‘भिंगरी’ यांसारखे चित्रपट ते करत होतेच. झाकोळ या चित्रपटाची निर्मिती करून त्यांनी आपले हातही पोळून घेतले. त्याचवेळी नाटकही अत्यंत गंभीरपणे सुरू होते. शनिवार, रविवार शूटिंग नाही, हा नियम त्यांनी नाटकासाठीच स्वत:ला घालून घेतला व अत्यंत कडकपणे पाळला. त्यामुळेच रंगमंचावरील जिवंत अभिनयाची भूक ते भागवू शकले.
हे असे सगळे चांगले सुरू असतानाच त्यांची भेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी झाली. सामाजिक कामाचा संस्कार डॉक्टरांना घरातूनच मिळाला होता. निळू फुले यांच्याशी त्यांचे मैत्र त्यातूनच जुळले होते. दाभोलकरांच्या भेटीनंतर डॉक्टरांना समाजासाठी काही करण्याची निकड भासू लागली. आपल्याला मिळालेला पैसा ते विविध सामाजिक कामांसाठी उपलब्ध करून देतच होते. मात्र, तो पुरेसा नव्हता. अशातच एका चर्चेच्या वेळी काही ठिकाणी सुरू असलेली सामाजिक कामे केवळ पैशांच्या अभावामुळे बंद पडत असल्याचा मुद्दा समोर आला. डॉक्टरांना त्याची खंत वाटली. यासाठी काही करायला हवे, असे त्यांच्या मनाने घेतले व मग त्यातूनच सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना आकाराला आली. खरे तर डॉक्टरांच्या चित्रपटसृष्टीत इतक्या ओळखी; त्याही अत्यंत सलगीच्या. मागितले असते, तर कोणीही त्यांना हवे तितके पैसे एकहाती दिले असते. तसे ते काही जणांनी देऊ केलेही. ‘लिहा म्हणाले, चेकवर आकडा तुम्हीच.’ पण, डॉक्टरांनी त्याला नकार दिला. ‘आमचा विचार ऐका, त्याच्या अंमलबजावणीत सहभागी व्हा, पैसे कशासाठी आहेत, ते समजावून घ्या,’ असा त्यांचा आग्रह असायचा. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंतांना घेऊन त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग बसवला. त्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. त्यातून काही कोटी रुपये जमा झाले. त्याचा ट्रस्ट करण्यात आला. त्या रकमेच्या व्याजातून आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत राहून तळागाळातील लोकांसाठी काम करणाºया कार्यकर्त्यांना आर्थिक मदत केली जाते.
अभिनयाची वेगवेगळी शिखरे पादाक्रांत करत असताना त्या शिखरावरून खाली पाहणारा, असा अभिनेता विरळाच!
डॉक्टर एवढ्यावरच नाही थांबले. दाभोलकरांच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत जाऊन चर्चात्मक व्याख्याने करायचा उपक्रम केला. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला. विवेकाचा जागर करण्यात आपल्याला असे योगदान देता आले, याचे त्यांना फार समाधान वाटते. अभिनयाच्या क्षेत्रातील स्वत:चा अमूल्य वेळ देऊ करत अशा लष्कराच्या भाकरी भाजणारा अभिनेताही विरळाच!
समाजाप्रती अशी तळमळ हे डॉक्टरांचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. आजही भारतात ग्रामीण भागात कसल्याही वैद्यकीय सुविधा नाहीत. यावर का नाही सरकार काही करत? ते करत नसतील, तर समाजातील मान्यवरांनी तरी त्यासाठी काही करायला नको का? किमान सरकारला जाग यावी म्हणून तरी काही केले का जात नाही? असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. स्वत:पुरते त्यांनी याचे उत्तर शोधले व सामाजिक कामात बराच मोठा वेळ दिला. प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येकाचे कर्तव्यच आहे, की त्याने समाजासाठी जसे जमेल, तसे काही तरी करावे. कलावंतांवर त्याची जबाबदारी जास्त आहे, असे डॉक्टरांचे मत आहे. समाजाकडून त्याला कौतुक मिळते, तर त्याचेही समाजाला काही देणे आहे. अनेक समाजसुधारकांनी आपले आयुष्य खर्च केल्यानंतरही समाजात विवेक शिल्लक दिसत नसेल, तर त्याला कलावंतांचा व अन्य समाजघटकांचा निष्क्रियपणाच कारणीभूत आहे, असे डॉक्टरांना वाटते.
या वाटण्यातूनच ते स्वत: सक्रिय झाले. यात आपण काही फार मोठे काम करतो आहोत, अशी त्यांची मुळीच भावना नाही. अगदी आतून, सहज आलेल्या एखाद्या गोष्टीला उगाचच मोठेपणाचे लेबल लावू नये, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे कोणी ‘डॉक्टर तुमच्यामुळे आम्ही...’, असे काही म्हणू लागला, की लगेचच ते त्याला थांबवतात. सहकारी कलावंतांबाबत डॉक्टर कमालीचे हळवे व तितकेच परखड विश्लेषकही आहेत. निळू फुलेंवर त्यांचे विशेष प्रेम. ‘त्यांच्या बरोबर काम करताना मजा यायची. ते फार मोठ्या ताकदीचे कलावंत होते,’ असे जुन्या आठवणींत मग्न होत ते सांगतात. नाना पाटेकर यांच्याकडूनही त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. ‘त्याच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे. नटसम्राट केले, तर तो त्याच्यात नव्याने आणखी बरेच काही करेल,’ असा त्यांना विश्वास आहे. मनात रुजेल, रुतून बसेल, असे नाटक येत नाही, याची खंत ते व्यक्त करतात. पण, म्हणून सगळा अंधारच आहे असे नाही, असेही त्यांना वाटते. चांगले लेखक येतील, चांगली नाटकं देतील व त्यातूनच चांगले कलावंतही तयार होतील, असा विश्वास त्यांना आहे.
(पूर्वप्रसिद्धी : १४ फेब्रुवारी २0१५)
- राजू इनामदार