बलात्कारितेचाच खून होतो आहे : पुष्पा भावे; समाजवादी महिला संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:03 PM2017-12-02T16:03:55+5:302017-12-02T16:43:00+5:30

फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.

Socialist Women's Convention inaugurated in Pune by Pushpa Bhave | बलात्कारितेचाच खून होतो आहे : पुष्पा भावे; समाजवादी महिला संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

बलात्कारितेचाच खून होतो आहे : पुष्पा भावे; समाजवादी महिला संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

Next
ठळक मुद्देमहिलांनी गांधीजींबरोबरही संघर्ष केला, ही लढाई समानतेची होती : पुष्पा भावे आज दाखविला जाणारा विकास म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार : मेधा पाटकर

पुणे :  आज संपूर्ण समाजात एक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपर्डीची घटना घडण्यापूर्वी काय नगर जिल्ह्यामध्ये बलात्काराच्या घटना घडल्या नाहीत काय? त्यामुळे बलात्कारितेचाच एकप्रकारे खून होतो आहे. फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.
देशावरील फॅसिस्ट विचारधारेचे संकट आणि स्त्रीवादी चळवळीसमोर उभी ठाकलेली आव्हाने यापार्श्वभूमीवर विविध समाजवादी-पुरोगामी आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये एकजूट वाढावी आणि स्त्री चळवळी संदर्भात विचारमंथन व्हावे या उददेशाने ‘हम समाजवादी संस्थाएँ’च्या वतीने आयोजित ‘अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलना’च्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. 
याप्रसंगी नर्मदा बचाओ आंदोलनाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य तसेच सुनिती सु. र., डॉ. मनीषा गुप्ते, रझिया पटेल आदी उपस्थित होते.
संघर्षाला ऐतिहासिकतेची एक किनार आहे असे सांगून पुष्पा भावे पुढे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षाचा लढा सुरू आहे. केवळ तो एकाच रेषेत चालू राहिलेला नाही. काळानुरूप प्रश्न बदलले नसले तरी हा संघर्ष नवे चेहरे घेऊन समोर आला आहे. यात फुले-आगरकर यांचा संघर्ष अधिक महत्त्वाचा ठरतो कारण स्त्री-पुरूष समानतेच्या संघर्षातून एक मानवीय समानतेचा प्रश्न त्यांनी मांडला आहे. या संघर्षात मग तो लढा स्वातत्र्याचा का असेना महिलांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले आहे. लढा देताना सामाजिक कार्यही महिला करीत होत्या. महिलांनी गांधीजींबरोबरही संघर्ष केला. ही लढाई स्त्रीपुरूष विरूद्धची नव्हे तर समानतेची होती.
आज डोक्याला फेटे बांधून बुलेटवर बसून बदलाची भाषा आपण करतो तेव्हा पुरूषांसारखेच व्हायचे ही विकृत वृत्ती येते. मानवीय प्रश्नांमध्ये काय भूमिका घेतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही. या समानतेच्या गप्पा करताना अनेक प्रश्नांकडे आपण हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहोत. ज्यावेळी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा महिलांना सुधारायची, त्यांची मानसिकता बदलायची भाषा केली जाते. मात्र पुरूषी दृष्टी बदलायला हवी यावर कुणी परिश्रम घेत नाही. समाजात जसे लहानग्या मुलींवर अत्याचार होत आहेत तसा अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. बलात्कारितेचाच खून होतो आहे. महिलांवर जे बलात्कार होत आहेत ते जातीय तेढ किंवा महिलांविषयीच्या मत्सरबुद्धीमधून होत आहेत आणि या अत्याचारांना महिलांना सामोरे जावे लागत आहे, अशी भीषण स्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मेधा पाटकर यांनी समाजातल्या विविध प्रश्नांवर महिलांनी दिलेल्या संघर्षांवर भाष्य केले. महिलांशिवाय कोणताही संघर्ष आणि परिवर्तन घडू शकत नाही. आज दाखविला जाणारा विकास म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे. नदी आणि व्यक्तीला ‘विकास’ या नावाने संबोधित केले जात आहे. शेतक-यांची नाळ जमिनीशी तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. या विकासाचा परिणाम सर्वात जास्त महिला भोगत आहेत. तरीही त्या लढा देत आहेत. महिलांमुळेच संघर्षाची ताकद अधिक बळकट होत आहे याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.
भाई वैद्य यांनी पंतप्रधान पद हे मोदींना भागवंतांनी दिलेले बक्षीस आहे, दंगलीतील सहभागाबद्दल मोदींना हे बक्षीस मिळाले आहे, अशा शब्दात मोदींवर निशाणा साधला.  
 

Web Title: Socialist Women's Convention inaugurated in Pune by Pushpa Bhave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.