पर्यावरणपूरक विसर्जनाला सोसायट्यांची पसंती
By admin | Published: September 12, 2016 02:38 AM2016-09-12T02:38:22+5:302016-09-12T02:38:22+5:30
महापालिकेने अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या केलेल्या आवाहनाला अनेक सोसायट्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पुणे : महापालिकेने अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून घरच्या घरी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याच्या केलेल्या आवाहनाला अनेक सोसायट्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत दहा हजार कुटुंबीयांनी अमोनियम बायकार्बोनेटच्या पाण्यात मिसळून घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन केले आहे. त्याचबरोबर ४० टन अमोनियम बायकार्बोनेटचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
महापालिका, एनसीएल व कमिन्स इंडिया यांच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुढाकार घेण्यात आला. गणेशमूर्तीच्या वजनाएवढे अमोनियम बायकार्बोनेट बादलीमध्ये मिसळून त्यामध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यास ती ४८ तासांच्या आत विरघळून जाते. विसर्जित झालेले पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते. पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी घरच्या घरी गणेश विसर्जन करण्याचे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शुक्रवार पेठेतील आल्हाद सोसायटीमध्ये प्रामुख्याने शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याचबरोबर सोसायटीच्या आवारातच बादलीमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विजयसिंह ठोंबरे, प्रशांत भागवत, सुमुख आगाशे, हेमंत खेरुड व इतर सभासदांनी यामध्ये सहभाग घेतला.
कर्वेनगर येथील २०० सदनिका असलेल्या सुवर्णरत्न गार्डन सोसायटीने पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन एका मोठ्या टबमध्ये पाण्यात अमोनियम बायकाबोर्नेट मिसळले. त्यामध्ये प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले, अशी माहिती सोसायटीच्या अध्यक्षा मंजूश्री खर्डेकर यांनी दिली. या वेळी सोसायटीचे उत्सवप्रमुख चंद्रकांत बारटक्के, सचिव स्मिता ढवळीकर, छाया सोनावणे, सरोज कुलकर्णी व अन्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेने सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये अमोनियम बायकार्बोनेट मोफत उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांच्या मागणीनुसार दोन किलोचे अमोनियम बायकार्बोनेटचे पाकीट दिले जात आहे. आतापर्यंत नागरिकांना ४० टन अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले. शेवटच्या दिवसापर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात त्याचे वाटप होण्याची अपेक्षा आहे. घरच्या घरी विसर्जनाचा एक आर्दश पुण्याकडून संपूर्ण देशाला घालून दिला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)