सोसायट्यांनी प्रथम तंटामुकत अभियान राबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:00 AM2021-02-05T05:00:31+5:302021-02-05T05:00:31+5:30
पुणे : जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी तसेच डीम्ड कन्व्हेयन्स डीड करण्यासाठी सोसायट्यांनी प्रथम तंटामुक्त अभियान राबविले पाहिजे, अशी ...
पुणे : जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी तसेच डीम्ड कन्व्हेयन्स डीड करण्यासाठी सोसायट्यांनी प्रथम तंटामुक्त अभियान राबविले पाहिजे, अशी सूचना सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी रविवारी एका चर्चासत्रात केली. डीम्ड कन्व्हेयन्स डीडची प्रक्रिया सोपी, सुटसुटीत तसेच ऑनलाइन पद्धतीने करावी. यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ सिंहगड रोड शाखा व केदारनाथ सार्वजनिक वाचनालय यांनी परिणय मंगल कार्यालयाच्या सभागृहात ‘रि डेव्हलपमेंट व डीम्ड कन्व्हेयन्स डीड’वर चर्चासत्र आयोजित केले होते. जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, राजाराम धोंडकर, पत्रकार विकास वाळुंजकर, ॲड. कणाद लहाने, नीता साळुंखे,मिलिंद डहाके, नगरसेवक हरिदास चरवड आदी सहभागी झाले होते.
आयुक्त कवडे म्हणाले, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अहंकार, गैरसमज, द्वेष, अपुरी माहिती इत्यादी कारणांमुळे कलह पसरतात. भांडणे होतात. त्यामुळे पुनर्विकासासाठी कामे मार्गी लागत नाहीत. म्हणून हाउसिंग फेडरेशनसारख्या संस्थांनी तंटामुक्त सोसायटी अभियान राबविले पाहिजे. एकत्र बसून सामंजस्याने मार्ग काढला पाहिजे. त्यामुळे सोसायट्यांच्या विकासाची कामे झटपट मार्गी लागतील. गेल्या १५ दिवसांत १८० हून अधिक सोसायट्यांनी सहकार खात्याकडे अर्ज दाखल केले आहेत. मुद्रांक शुल्कसारखे विषय पुढे येतात. त्या टप्प्यावर हे काम थांबू नये. म्हणून आम्ही मुद्रांक शुल्क विभाग व सहकार खाते यांच्यात समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या विचारात आहोत.
या चर्चासत्रात सोसायट्यांचा मार्गदर्शक या पुस्तिकेचे प्रकाशन केले. पुणे महापालिकेने पुनर्विकास या विषयासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करावा. कमीत कमी वेळात व कमीत कमी कागदपत्रे सादर करून डीम्ड कन्व्हेयन्स डीड केले जावे. सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सहकार खात्याने स्वतंत्र विभाग सुरू करावा. ऑनलाइन नोंदणीसाठी सदस्यांना प्रशिक्षण द्यावे आदी सूचना विविध वक्त्यांनी केल्या. तसेच कन्व्हेयन्स डीड न करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून त्याची तक्रार पोलिसांकडे कशी करावी? याची माहिती दिली. एनए टॅक्स, अपार्टमेंट कायदा, मुद्रांक शुल्क, सोसायटी नोंदणी. लेखापरीक्षण इ. विषयांचे वक्त्यांनी विवरण केले. चैतन्य पुरंदरे यांनी आभार मानले. समीर रूपदे यांनी सूत्रसंचालन केले.