संत विचारांपासून दूर गेल्यानेच समाजात दुष्ट प्रवृत्ती वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 07:23 PM2019-07-13T19:23:43+5:302019-07-13T19:27:46+5:30
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ज्या रचनां संगीतबद्ध केल्या आहेत, त्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पुणे : “संत कमी शब्दांत बरच काही सांगून जातात. त्यांच्या साहित्याचा, वचनांचा आणि विचारांचा प्रभाव खूप मोठा असतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या संतांनी त्यांच्या विचारांना बराच काळ माणसातील पशूप्रवृत्तीला, दुष्टपणाला आळा घातला होता. आज लोक त्याच विचारांपासून दूर गेले आहेत. त्यामुळेच वाईट प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत.” असे मत ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘हेरीटेज द आर्ट लीगसी’ आयोजित व ‘अनाहत, पुणे’ निर्मित ‘घन अमृताचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या ज्या रचनां संगीतबद्ध केल्या आहेत, त्यावर आधारित गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या रचनांविषयी आठवणी सांगताना मंगेशकर म्हणाले, “संत ज्ञानेश्वरांच्या रचनेला चाल लावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. त्यांचा प्रत्येक शब्द मोलाचा असतो, पण चाल लावताना मीटरमध्ये बसविण्यासाठी काही स्वातंत्र्य घ्यावे लागते. माझे मराठीचे ज्ञान जरा बरे असल्याने कोणता शब्द वगळल्याने अर्थ बदलणार नाही याचा विचार करून त्याला चाल लावली. यासाठी अनेक अभ्यासक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन अर्थ समजून घेतला. मोगरा फुलला हे माझ्या आयुष्यातील उत्तम गाणं आहे. पण त्याला दुःखाची झालर आहे असे मला वाटते. संत ज्ञानेश्वरांच्या दु:खांच्या अनुभवातून हे गाणं आले असावे असे मला वाटते.” “साहित्यावर अनेक आक्रमणे झालीत. त्यामुळे मुळ कोणते आणि अपभ्रंश झालेले कोणते हे सांगणे तसे कठीण आहे. पण संतांचे प्रत्येक वचन गहन असते. त्यावर शंका घेऊ नये. कारण त्यांच्यासारखे शब्दप्रभुत्व, भाषाप्रभुत्व नंतर क्वचितच कोणात आले असावे.” असेही ते म्हणाले.
यावेळी प्रसन्न बाम (संवादिनी), नितीन शिंदे (तबला), नागेश भोसेकर (पखवाज), प्रतिक गुजर (तालवाद्य), मिहीर भडकमकर (कीबोर्ड), प्रशांत कांबळे (साउंड) यांनी साथसंगत केली.