२२ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यासाठी सोसायटी संघाचे मानवी साखळी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 15:52 IST2025-02-02T15:52:07+5:302025-02-02T15:52:21+5:30
डीपी रस्ता परिसरातील ४० सोसायटीमधील शेकडो सदस्यांच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

२२ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यासाठी सोसायटी संघाचे मानवी साखळी आंदोलन
-सलीम शेख
शिवणे : कर्वेनगर येथील नदीपात्रातील २२ वर्षापासून रखडलेला डीपी रस्ता पूर्ण न करताच सन सिटी ते दुधाणे लॉन्स हा मुठा नदीवरील पूल खुला करण्याचा घाट लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या निषेधार्थ कर्वेनगर डीपी रस्ता परिसरातील ४० सोसायटीमधील शेकडो सदस्यांच्या वतीने मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
पूल बांधण्यासाठी आमचा विरोध नाही परंतु अनेक वर्षांपासून प्रलंबित डीपी रस्ता अगोदर पूर्ण करावा जेणेकरून भविष्यात पुलावरून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही असे मत यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले. सदर मानवी साखळी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सोसायटी सभासद,जमिनीचे मालक तसेच स्थानिक पुढारी उपस्थित होते.
आमचा पूल बनवण्यासाठी विरोध नाही परंतु त्याआधी रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. डीपी रस्त्यामध्ये सर्वात जास्त माझी जागा आहे त्यासाठी मी गेली तीन वर्षं पाठपुरावा करत आहे. शासन आम्हाला टीडीआर देत असेल तरी चालेल परंतु सर्व प्रक्रिया होऊन देखील हा रस्ता होऊ शकला नाही. रस्ताच पूर्ण झाला नाहीये तर मग पुलाची घाई कशासाठी केली जात आहे. - कुमार बराटे,डीपी रस्ता जागा मालक
२२ वर्षापासून रस्त्याचे काम प्रलंबित आहे. प्रत्येक वेळी प्रस्ताव येतात परंतु पुढे काहीच होत नाही. रस्ता पूर्ण न करताच पूल बनवला तर या भागात वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण होईल. आम्ही जागा देण्यासाठी सकारात्मक आहोत परंतु आमच्या जागेचा योग्य मोबदला मिळाला तरच जागा देणार आहोत. -अभिजित बराटे,डीपी रस्ता जागा मालक
आमच्या जागेचा योग्य मोबदला टीडीआर किवा रोख स्वरूपात मिळाला तरच आम्ही जागा देणार आहोत. प्रशासनाने त्वरित मागणी मान्य करून पुढील प्रक्रिया करावी. -संदीप जावळकर,डीपी रस्ता जागा मालक
येथील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीला समान न्याय मिळाला पाहिजे. ५० टक्के टीडीआर आणि ५० टक्के रोख स्वरूपात मोबदला द्यावा. या अगोदर ज्या लोकांना रोख स्वरूपात मोबदला दिला आहे तसाच आम्हाला सुद्धा द्यावा ही आमची मागणी आहे. -बंडा शेठ बराटे,डीपी जागा मालक
४० सोसायटीमधील नागरीक एकत्रित येऊन त्यांनी रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून मगच पूल सुरू करण्याची मागणी केली जी अतिशय रास्त असून आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. पुलावरून येणारी वाहने ही डीपी रस्त्याला जोडली तरच वाहतूक सुरळीत चालेल अन्यथा गल्लीबोळातून वाहने जाऊन वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी शासनाने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिवणे खराडी रस्त्याचे काम मार्गी लावावे ही आमची मागणी आहे. -स्वप्नील दुधाणे कोथरुड विधानसभा अध्यक्ष
कर्वेनगर संघटित सोसायटी मंचच्या वतीने आमची मागणी आहे की गेली २२ वर्ष प्रलंबित ठेवलेला रस्ता पूर्ण करावा त्यानंतरच पुलाचे काम करावे. डीपी रस्त्यावर रात्रीची पोलीसांनी गस्त वाढवावी येथे रात्री उशिरापर्यंत टोळकी बसलेली असतात.अनवी साखळी आंदोलनासाठी आलेल्या सर्व सभासदांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. - सदस्य,कर्वेनगर संघटित सोसायटी संघ
या कामासाठी मी गेली अनेक महिन्यांपासून जागा मालकांबरोबर चर्चा करत आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रव्यवहार करून यासंदर्भात मार्ग काढणार आहे. मी सर्वांच्या वतीने ५० टक्के टीडीआर आणि रोख देण्यासाठी मागणी करणार आहे. सर्व जागामालक सकारात्मक असून त्यांना रोख मोबदला मिळावा अशी मागणी करणार आहे. -राजेंद्र बराटे,माजी नगरसेवक१५ वर्षापासून सुरू असलेला शिवणे खराडी रस्ता करण्यासाठी बजेट उपलब्ध आहे परंतु जमीनी ताब्यात घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत. जे जागामालक जागा द्यायला तयार आहेत त्यांच्या बरोबर तडजोड करून हे काम मार्गी लावले पाहिजे होते. रस्त्यासाठी १५ कोटींचे टेंडर होते आणि वर्क ऑर्डर देखील निघाली आहे परंतु जमिनी ताब्यात नसल्यामुळे काम थांबले आहे. - सुशील मेंगडे,माजी नगरसेवक
आम्ही सर्व जागा मालकांची बैठक घेऊन वर्गवारी तयार करणार आहोत. सर्व जागामालकांच्या मागण्यांवर चर्चा करून योग्य मार्ग काढण्यात येईल. महानगरपालिका या रस्त्यासंदर्भात अत्यंत सकारात्मक असून आम्ही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता, मनपा