समाज विक्षिप्ततेकडे सरकतोय - भारत सासणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:30 AM2018-07-13T02:30:48+5:302018-07-13T02:31:17+5:30
समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत.
पुणे : समाज विक्षिप्ततेकडे सरकत चालला आहे. ही विक्षिप्तता अस्वस्थ करणारी आणि भयावह आहे. समाजाला सातत्याने धक्के बसत आहेत, जीवनातील तणावामुळे मानसजन्य रोग दारावर येऊन ठेपले आहेत. या पार्श्वभूमीवर कथा व्यक्तिजीवनाकडून समूहजीवनाकडे चालली आहे. लेखनावर वास्तववादाचे आक्रमण होत असताना मानवी जीवनाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांनी केले.
दिलीपराज प्रकाशनाच्या वतीने प्रा. मिलिंद जोशी लिखित ‘खेळ’ या कथासंग्रहाचे प्रकाशन गुरुवारी सायंकाळी एस. एम. जोशी सभागृहात साहित्यिक राजन खान यांच्या हस्ते झाले. कथाकार भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास लेखक आणि संगीतकार आशुतोष जावडेकर, प्रकाशक राजीव बर्वे उपस्थित होते. या वेळी नाशिकमधील दि जिनियस या संस्थेच्या कलावंतांनी या निवडक कथांचे अभिवाचन केले.
सासणे म्हणाले, ‘‘समाजाला निद्रस्त करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. सध्या माणूस अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जात आहे. बदलत्या काळात साहित्यात आव्हाने निर्माण झाली, तशी कथेची रूपेही बदलत गेली. कथेतून माणसाच्या आणि समाजाच्या व्यथांवर भाष्य केले जाते. मनोविश्लेषणात्मक आणि आस्थेवाईक कथांची, व्यक्तिजीवनाबद्दल बोलणाऱ्या कथांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून लेखनाला वैश्विक उंची प्राप्त होऊ शकेल.’’
प्रकाशक राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले. अनुज बर्वे यांनी आभार मानले.
१ आशुतोष जावडेकर म्हणाले, मराठीसारखे वैविध्य, समृद्धी इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठीत कमी प्रमाणात का असेना, कथांचे चित्र आशादायी आहे. मल्टिपल स्क्रीनच्या जमान्यात कथेतील गोष्ट मात्र हरवत चालली आहे. साहित्य हा साच्याविरोधात चाललेला अविरत संघर्ष आहे. कथासंग्रहात सुसूत्रता नसावी; मात्र, साचेबद्धपणा नसावा.
२ मिलिंद जोशी म्हणाले, कथा ही कल्पना आणि वास्तवाचा खेळ असते. जीवनातील व्यामिश्रता लक्षात घेता, कथेच्या माध्यमातून ठरावीक कंगोºयातून जीवनाचे दर्शन घडवणे हे आव्हान असते. लेखक कथांमधून जीवनाचा अन्वयार्थ मांडतो. माणूस हा नात्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू असतो. दुभंगलेली मने, हरवलेला संवाद आणि विस्कटलेली नाती हे आजचे चित्र आहे. या परिस्थितीत नात्यातील अवकाश राखणे, आसक्ती अथवा विरक्तीकडे न जाता सुवर्णमध्य काढून नात्यातील संबंध दृढ करावा.
कोणत्याही चौकटीत लिहिणारा, अथवा विशिष्ट पालखी वाहणारा लेखक असूच शकत नाही. चौकटीबाहेर विचार करणारा, वास्तव जोखणारा आणि व्यापक दृष्टीने पाहणारा खरा लेखक असतो. संवेदना जपणारा, आतमध्ये थोडे रडू जिवंत असलेला माणूसच लेखक होऊ शकतो. मराठी साहित्य जातीवाद, धर्मवाद, प्रदेशवादात अडकले असताना तटस्थ लिहिणारे, खुल्या अवकाशात वावरणारे लेखक वर्षानुवर्षे लक्षात राहतात.
- राजन खान