समाजाला हवे उद्बोधक साहित्य : प्रतिभाताई पाटील; पुण्यात अॅड. रावसाहेब शिंदे पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 01:20 PM2018-01-27T13:20:19+5:302018-01-27T13:24:54+5:30
उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.
पुणे : नवसमाजरचनेमध्ये अक्षर साहित्य समाजोपयोगी असण्याची गरज आहे. शरीराला ज्याप्रमाणे भरणपोषणाची आवश्यकता असते, त्याप्रमाणे मनाच्या उद्बोधनासाठी साहित्य, विचार, चिंतनाची गरज असते. जे लेखन वाचकांना अस्वस्थ करते, आत्मपरीक्षण करायला लावत नव्या जाणिवांचे दालन खुले करते, जुन्या मूल्यांची नव्याने जाणीव करून देते, अशा उद्बोधक साहित्याची आणि हिऱ्यासारख्या साहित्यिकांची समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य कलाप्रसारिणी सभेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी अॅड. रावसाहेब शिंदे यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार प्रदान सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कमलकिशोर कदम यांना गौरविण्यात आले. उद्योजक विक्रम उरमोडे, कवयित्री सुप्रिया वाईकर, रवींद्र डोमळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य होते. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शशिकला रावसाहेब शिंदे उपस्थित होते. पाटील म्हणाल्या, ‘ऋषी, साधू होण्यासाठी हातात कमंडलू घेऊन, विशिष्ट रंगाचे कपडे घालून हिमालयात जायला पाहिजे, असे नाही. राजकारण, समाजकारणात उत्तम काम करूनही ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आकाराला येते. रावसाहेबांना भेटल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्यासारखा आनंद व्हायचा.
ज्यांच्यासमोरनैवेद्य ठेवावा आणि ज्यांचा प्रसाद घ्यावा, असे देव आता उरलेले नाहीत. रावसाहेब शिंदे यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या नावाचा पुरस्कार म्हणजे प्रसाद आहे. समाजाची सात्त्विकता, सुसंस्कृतता आणि सामाजिकता जपणारी आमची बहुधा शेवटची पिढी आहे.
- मधू मंगेश कर्णिक
कदम म्हणाले, ‘शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मोठ्या माणसांनी या शहराचा समृद्ध इतिहास घडवला. मागच्या पिढीने दिलेले देणे या पिढीने जपून ठेवले पाहिजे, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवावे. त्यातूनच महाराष्ट्राचे उजवल भवितव्य घडेल.’
भावे म्हणाले, ‘निवडणुकीत ८० टक्के मतदान गरीब तर २० टक्के मतदान श्रीमंत करतात. मात्र, निवडणुकीनंतर २० टक्के श्रीमंत लोकांनाच लाभ मिळतो. सध्या पद्मावती हा प्रश्न नाही, तर रोजगार हा खरा प्रश्न आहे.’
वैद्य म्हणाले, ‘रावसाहेब शिंदे यांचे जीवन म्हणजे ध्यासपर्व आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांनी सर्वस्व अर्पण केले. आपल्या देशातील माणसे अशी सुसंस्कृत झाली तर आपला देश जगातील संस्कृतीच्या शिखरावर जाऊन बसेल.’
उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले.