तू बोलशील, वाचा फोडशील, तेव्हाच समाज बदलेल...!

By admin | Published: April 4, 2016 01:19 AM2016-04-04T01:19:40+5:302016-04-04T01:19:40+5:30

पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात

The society will change when you say, will break the book ...! | तू बोलशील, वाचा फोडशील, तेव्हाच समाज बदलेल...!

तू बोलशील, वाचा फोडशील, तेव्हाच समाज बदलेल...!

Next

पुणे : पुरोगामी पुणे जिल्ह्यात मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळतो का, याबाबत लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून पाहणी केली असता, अजूनही काही मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नसल्याचे वास्तव समोर आले. याबाबतचे वृत्त रविवारी प्रसिद्ध झाल्यानंतर लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांच्या लढ्याला बळ मिळाले. महिलांनी बोलले पाहिजे, वाचा फोडली पाहिजे, तेव्हाच समाज बदलेल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. तसेच ‘लोकमत’ने केलेली पाहणी कौतुकास्पद असल्याचे अनेकांनी सांगितले. स्टिंग आॅपरेशनमुळे महिलांमध्येही जागरुकता निर्माण झाली असून, मूलभूत हक्क-अधिकाराची यानिमित्ताने जाणीवजागृती झाल्याची प्रतिक्रिया देखील अनेकांनी व्यक्त केली.
माजी जिल्हा सरकारी वकील व या प्रकरणातील एक याचिकाकर्त्या अ‍ॅड. निलीमा वर्तक यांनी सांगितले की, महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे स्वागत आहे़ महिलांना मंदिर प्रवेश नाकारणे या सर्व चुकीच्या गोष्टी असून याबाबत आपण पोलिसांकडे तक्रार करणार आहे. नाथपंथी असलेल्या एका मंदिरात महिलांना खुला प्रवेश दिला जातो आणि एका ठिकाणी नाही, हा भेदभाव आहे़ देवळांना हा नियम लागू आहे, आम्हाला नाही, असे त्यात म्हटले आहे़ ते बरोबर नाही़ न्यायालयाने आपल्या निर्णयात देवळे व सार्वजनिक प्रार्थनास्थळे असे म्हटले आहे़ ज्या मंदिरांचे सार्वजनिक ट्रस्ट आहेत़ त्यांनाही हा निर्णय लागू आहे़ ओंकारेश्वर मंदिर हे खूप जुने आहे़ त्याचा जुना तपशील पाहिला तर महिला नक्कीच तेथे पूजा करीत असतील, असे वाटते़
‘‘न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर लगेचच त्याबद्दल समाजमनाची मानसिकता तपासण्याचा लोकमतचा स्टिंग आॅपरेशनचा उपक्रम अभिनास्पद वाटला. महिलांनाही समान हक्क-अधिकार आहेत. असे असताना काही ठिकाणी मात्र महिलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होताना दिसतो. त्यापैकीच शनिशिंगणापूर असेल, अथवा त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी आम्ही प्रातिनिधीक स्वरुपात हक्कासाठी लढाई लढत आहोत. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून हाच विचार समाजासमोर मांडला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश खुला असला पाहिजे. खरं तर आधीच याबाबतचा निर्णय झालेला आहे. महिलांना प्रवेश बंदी केल्यास अथवा मंदिर प्रवेशापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास सहा महिन्यांचा कारावास अथवा दंडाची शिक्षा आहे,’’ असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रतिमा परदेशी म्हणाल्या, जात आणि धर्मव्यवस्थेच्या प्रभावामुळे तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क-अधिकार वापरता आले नाहीत. महिलांना आजच्या काळातही मंदिरात खुला प्रवेश मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ‘लोकमत’ने लक्ष वेधून लोकप्रबोधनाबरोबरच महिलांना त्यांच्या हक्क-अधिकाराची जाणीव करून देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
‘‘शोषीत जनतेला नेहमीच न्याय हक्कासाठी लढाई करावी लागलेली आहे. कायद्याने सर्वांना समान अधिकार असला, तरी तो मिळविण्यासाठीही जनतेला लढाई करावी लागते, ही खेदाची बाब आहे. समाजाला पुढे घेऊन जाणारा विचार सर्वांनी मान्य करायला हवा. जात आणि धर्म व्यवस्थेत महिलांना नेहमीच दुय्यम स्थान देण्यात आले. जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महिलांना दुय्यम वागणूक देण्यात आली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेऊन शाळा सुरू केली. त्या फुल्यांच्या पुण्यात महिलांना मंदिर प्रवेश नसणे ही शोकांतिका म्हणावी लागेल. ‘लोकमत‘ने समाजासमोर वास्तव आणल्याने आता तरी महिला स्वत:हून पुढे येतील, अशी आशा वाटते,’’ असे सत्यशोधक जनआंदोलन संघटनेचे किशोर जाधव यांनी सांगितले.

Web Title: The society will change when you say, will break the book ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.