धानोरीतील सोसायटीच्या तीन बोअरवेल गेल्या चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 07:00 AM2019-08-30T07:00:00+5:302019-08-30T07:00:06+5:30
अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात येते.
पुणे : अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथं खाऊ या चित्रपटात विहीर चोरीला गेल्याची तक्रार करण्यात येते. त्यावरुन प्रशासकीय गलथानपणा विनोदी ढंगाने दाखविण्यात आला आहे. तसाच काहीसा प्रकार धानोरी येथील एका आलिशान गृहसंस्थेत घडला आहे. बांधकाम व्यावसायिकाने केवळ कागदावर दाखविलेली बोअरवेल (विंधन विहिर) शोधण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली आहे. त्यासाठी त्यांनी चक्क पोलिसांकडे धाव घेतली असून, बोअरवेल परत मिळवून देण्याची विनंती केली आहे.
धानोरी येथील पल्लाडियम ग्रँड या प्रकल्पातील रहिवाशांनी विश्रांतवाडी पोलिसांत मंगळवारी (दि. २७) तक्रार दाखल केली आहे. पल्लाडियम सोसायटीमधे पाच इमारती असून, त्यात १४० सदनिका आहेत. बांधकाम व्यावसायिकाने वेळेत सोसायटी करुन दिली नाही म्हणून कागदपत्रे गोळा करताना रहिवशांना ही बाब लक्षात आली. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी महानगरपालिकेला गृहसंस्थेच्या ३ बोअरवेल असल्याचे सांगितले होते. तशी कागदपत्रे देखील त्यांनी सादर केली. मात्र, प्रत्यक्षात गृहसंस्थेच्या आवारामधे बोअरवेलच नाही.
गृहसंस्थेतील सदस्य विश्वास चव्हाण, दिनेश चंद, प्रशांत पाटील यांच्यासह काही रहिवाशांनी बांधकाम व्यावसायिका विरोधात विश्रांतवाडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पल्लाडियम प्रॉपर्टीज, श्रेयस शेल्टर व रावजी कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी गृह प्रकल्पाचे काम केले आहे. पूर्णत्वाचा दाखला घेण्यासाठी महापालिकेकडे नवी पेठेतील श्रीराम बोअरवेल्सचे प्रमाणपत्र जोडले. महापालिकेच्या अधिकाºयांनी पाहणी करुनच पूर्णत्वाचा दाखला दिला असेल. संबंधित प्रकल्पात महापालिकेचा पाणी पुरवठा होत नसल्याने टँकर आणि बोअरवेलद्वारे पाणी पुरवठा करण्याचे हमीपत्र संबंधित बांधकाम व्यावसायिकांने दिले होते. आम्ही रहिवासी २००८ पासून येथे रहात आहोत. मात्र, परिसरात आम्हाला बोअरवेल दिसली नाही. महापालिका मात्र तीन बोअरवेल असल्याचे म्हणते. त्यामुळे या बोअरवेल चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे आमच्या बोअरवेल मिळवून द्याव्यात अशी विनंती संस्थेतील रहिवाशांनी तक्रारीत केली आहे.
तक्रारदार विश्वास चव्हाण म्हणाले, बांधकाम व्यावसायिकाने दावा केल्या प्रमाणे आमच्या गृहसंस्थेच्या आवारात बोअरवेल दिसून येत नाही. आम्हाला अद्यापपर्यंत कोणत्याही बोअरवेलचे पाणी मिळालेले नाही. कागदोपत्री मात्र बोअरवेल असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे.
---
संबंधित सोसायटीमधे बोअरवेल होते की नाही याबाबत शंकाच आहे. महापालिकेने मात्र संबंधितांना परवानगी दिलेली दिसते. मात्र संबंधित गृहसंस्थेने पाण्यावर केलेला खर्च महापालिकेच्या संबंधित अधिकाºयाकडून वसूल करावा.
-विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे
-------------------------