मृदू ‘मा. गो.’ सडेतोड होते : प्रा. देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:09 AM2020-12-27T04:09:05+5:302020-12-27T04:09:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मा. गो. वैद्य यांचे व्यक्तिमत्त्व वेडेवाकडे संकोच करणारे नव्हते. आपल्या मताशी ठाम राहणारे होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “मा. गो. वैद्य यांचे व्यक्तिमत्त्व वेडेवाकडे संकोच करणारे नव्हते. आपल्या मताशी ठाम राहणारे होते. विचारांवर श्रद्धा ठेवणारे ते एक श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व होते. हिंदू राष्ट्र, हिंदुत्व याची संकल्पना त्यांनी मांडली. हिंदुत्त्वाचे औदार्य त्यांनी समाजापुढे मांडले. हिंदूत्व सांगण्यासाठी त्यांनी बचावात्मक भूमिका कधीही घेतली नाही. असे मृदू असणारे व्यक्तिमत्त्व सडेतोड होते,” या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व. संघ) अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन आयोजित रा. स्व. संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक, विचारवंत, लेखक, माजी आमदार मा. गो. वैद्य तथा बाबूराव वैद्य श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, अध्यक्ष किशोर शशीतल, कार्यवाह राजन ढवळीकर आदी स्वयंसेवक उपस्थित होते.
प्रा. देशपांडे म्हणाले की, ते व्यवहारात कर्मठ होते. हिंदुत्त्वाची उकल करताना तर्क न मांडता निष्ठा मांडली. त्यांच्या विचारात स्पष्टता, परिपक्वता होती. हिंदुत्व ही धर्मनिरपेक्षतेची ‘गॅरंटी’ आहे असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी ३० वर्ष प्रत्येक दिवशी एक स्तंभ लिहिला. दिलेल्या मर्यादित शब्दांत नेमकेपणा त्यांच्या लिखाणातून ते मांडत. शंभरी गाठण्याची त्यांची इच्छा होती. ते मिश्कील स्वभावाचे होते. त्यांची जीवन गाथा काही असेल तर ती म्हणजे संघ होय. वयाच्या ११ व्या वर्षापासून ते संघाशी जोडले गेले. आणखी तीन वर्षे ते जगले असते तर शंभरीचा आनंद साजरा करता आला असता.
“मी प्रचारक म्हणून कधी काम केले नाही मात्र प्रचारकांचा बाप आहे, असे ते म्हणत. हिंदुत्वची कसोटी समाज जीवानाला लागू करता येईल हे तत्व त्यांनी मांडले. त्यांच्या एका व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते,” असे सांगत त्यांनी वैद्य यांच्या आठवणींना प्रा. देशपांडे यांनी उजाळा दिला.