निराधारांच्या भुकेसाठी सोहमची ‘अन्नपूर्णा’ धावून आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:30+5:302021-05-03T04:07:30+5:30
पुणे : कोरोना काळात हातावरचे पोट असणा-यांचा रोजगार थांंबल्यामुळे ही लोक आता रस्त्यावर आली आहेत. हे निराधार आहेत, ...
पुणे : कोरोना काळात हातावरचे पोट असणा-यांचा रोजगार थांंबल्यामुळे ही लोक आता रस्त्यावर आली आहेत. हे निराधार आहेत, पण भिक्षेकरी नाहीत. त्यांच्यासाठी सोहम ट्रस्टतर्फे ‘अन्नपूर्णा’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. हा अन्नदानाचा यज्ञ सुरू करताना व्यवसाय ठप्प असलेल्या खाणावळीचालकांकडून डबे विकत घेऊन काही निराधारांकडून डबे पोहोचविण्याचे काम करवून घेत त्यांच्याही हाताला काम देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे त्यातील विशेष!
भिक्षेक-यांवर वैद्यकीय उपचार करताना करोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर हातावरचे पोट असणारे, मजूर, वाढपी, छोटे व्यवसाय करणारे या सर्वांचा रोजगार थांबला आहे. हाताला पैसे नाहीत, जेवणाचे हाल होत आहेत. करोना काळात शहरातील पुलांखाली, पदपथावर निराधार आणि निराश्रित असे हे लोक बसलेले दिसत आहेत. भिक्षेकरी नसलेल्या लोकांसाठी काहीतरी करावे या हेतूने त्यांना जेवण देणे आणि बंद पडलेल्या खानावळीमधून जेवण विकत घेऊन निराश्रित लोकांना जेवण देणे हा विचार समोर आला. सामाजिक जाणीवेमधून हा ‘अन्नपूर्णा’ उपक्रम सुरू केला असल्याची माहिती सोहम ट्रस्टचे डॉ. अभिजित सोनवणे यांनी ‘लोकमत’ ला दिली. सुरूवातीला रोजचे ५० डबे आपण देत आहोत आणि ही संख्या हळूहळू २०० पर्यंत वाढविण्याचा विचार आहे. ज्यांचा खाणावळीचा व्यवसाय बंद झाला आहे. अशा पाच लोकांची निवड करून त्यांच्या प्रत्येकाकडून दहा डबे विकत घेत आहोत. एका डब्याची किंमत ५० रूपये आहे. असे रोजचे त्यांना ५०० रूपये आपण देणार आहोत. महिना १५ हजार रूपये त्यांना मिळतील अशी सोय करीत आहोत. जी लोक रस्त्यावर निराधार बसली आहेत, त्यांच्याच हाताला काम देत असल्याचे ते म्हणाले.
--------------------------
एका हाताने भुकेलेल्याला जेवण आणि दुस-या हाताने काम देत आहोत. आपल्याला जेव्हा लागते तेव्हा ती "वेदना" आणि दुस-याला लागते तेव्हा त्या "संवेदना". त्या संवेदना जगण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- डॉ. मनीषा सोनावणे, प्रकल्पप्रमुख अन्नपूर्णा