‘उजनी’चा ‘तो’ आदेश रद्द केल्याने सोलापूर-इंदापूर आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:16+5:302021-05-20T04:10:16+5:30

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरून मंजूर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा आदेशच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ...

Solapur-Indapur clash over revocation of 'Ujani' order | ‘उजनी’चा ‘तो’ आदेश रद्द केल्याने सोलापूर-इंदापूर आमनेसामने

‘उजनी’चा ‘तो’ आदेश रद्द केल्याने सोलापूर-इंदापूर आमनेसामने

Next

कळस : इंदापूर तालुक्यातील सिंचनासाठी उजनी जलाशयावरून मंजूर करण्यात आलेल्या ५ टीएमसी योजनेचा आदेशच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता उजनी जलाशयावरील इंदापूर विरूद्ध सोलापूर हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण भागाला या निर्णयामुळे पाण्यासाठी उपेक्षाच सहन करावी लागणार आहे.

भीमा नदीवरील उजनी धरणासाठी इंदापूर तालुक्याचा मोठा त्याग आहे. मात्र, इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीला पाण्यावरून राजकारण तापत होते. त्यामुळे गेली ३० वर्षापासून धगधगणा-या खडकवासला कालव्यावरील ३६ गावांचा व नीरा डावा कालव्यावरील २२ गावांचा पाणी प्रश्न उजनीवरील उपसा सिंचनला मंजुरी मिळाल्यामुळे सुटणार ,अशी अपेक्षा शेतक-यांना होती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या योजनेला कडाडुन विरोध केला. परिणामी जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांच्याकडुन आदेश करण्यास भाग पाडले. याचे पडसाद तालुक्यात उमटू लागले आहेत. खडकवासला कालव्यावर पुणे शहराचा पाण्याचा भार वाढल्याने तालुका सिंचनासाठी संकटात आला आहे. खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. कालव्याला पाणीही कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. सुमारे २० हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबुन आहे. दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ केली जाते. महत्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला दिली जात होती. इंदापुर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबुन आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही अवस्था उन्हाळ्यात गंभीर आहे. नवीन उपसा सिंचनमुळे शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावामधील क्षेत्र बारमाही ओलिताखाली येणार होते.

तसेच खडकवासला कालव्यावरुन सणसर जोड कालव्यामधून २२ गावांना पाणी देण्यासाठी अनेक संघर्ष झाला. अनेक वेळा आंदोलने झाली मात्र अंथुर्णेपासुन पुढे २२ गावांना बारमाही पाणी मिळवण्यासाठी गेली ३० वर्षे लढा चालु होता.खडकवासला धरणसाखळीत पाणी कमी राहत असल्याने सणसर जोड बोगद्यालाही पाणी दिले जात नव्हते. आता या गावांनाही त्याचा मोठा फटका बसणार आहे.

तालुक्याने उजनी धरणासाठी मोठा त्याग केला आहे. २८ गावांना घरदारे जमिनीसह विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र, त्याच तालुक्याला पाण्यासाठी उपेक्षा करावी लागत आहे.

—————————————————

Web Title: Solapur-Indapur clash over revocation of 'Ujani' order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.