Cricket World Cup 2023: सोलापूर टू गहुंजे व्हाया न्यूझीलंड...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 04:25 PM2023-11-16T16:25:16+5:302023-11-16T16:26:18+5:30

कोणत्याही चित्रपटाची कथा नसून, राहुल पाटील या सोलापूरच्या क्रिकेटवेड्या व्यक्तीची सत्यकथा

Solapur to Gahunje via New Zealand | Cricket World Cup 2023: सोलापूर टू गहुंजे व्हाया न्यूझीलंड...!

Cricket World Cup 2023: सोलापूर टू गहुंजे व्हाया न्यूझीलंड...!

उमेश गाे. जाधव

- मूळचा सोलापूरचा एक तरुण, न्यूझीलंडच्या तरुणीशी लग्न करून तिकडेच स्थायिक होतो, तेथेही क्रिकेटची आवड जपतो. नंतर तेथीलच एका वृत्तपत्राच्या माध्यमातून क्रिकेटचा महाकुंभ समजली जाणारी विश्वचषक स्पर्धा लेखणीतून मांडण्यासाठी आपल्या मायभूमीत पाऊल ठेवतो. ही कोणत्याही चित्रपटाची कथा नसून, राहुल पाटील या सोलापूरच्या क्रिकेटवेड्या व्यक्तीची सत्यकथा आहे.  


राहुल मूळचा सोलापूरचा; पण वाढला गोव्यात. वडील गोव्यात कमिन्स कंपनीत नोकरीला होते. त्यामुळे त्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण गोव्यातच झाले. काॅन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतल्यामुळे इंग्रजीवर चांगली पकड होती. गोव्यातील एका हाॅटेलमध्ये त्याने हाॅस्पिटॅलिटीचे काम सुरू केले. हाॅटेलच्या कामानिमित्त तो सावंतवाडीतही काही वर्षे राहिला. त्याचवेळी राहुलने मित्रासोबत दरवर्षी परदेश दौरा करण्याचे ठरवले. पहिलाच देश जवळचा असावा म्हणून हाँगकाँगला जायचे ठरले. तिथे पहिल्या दिवशी राहुल एकटाच फिरायला बाहेर पडला. बुद्ध विहार फिरताना व फोटो काढताना न्यूझीलंडच्या कॅरोलाइन जोन्स या मुलीशी त्याची नजरानजर झाली. ओळख झाली. तारा जुळल्या. दीड- दोन वर्षांच्या मैत्रीनंतर त्यांनी लग्न केले. कॅरोलाइन लंडनला नोकरीला होती. लग्नानंतर राहायचे कुठे, असा प्रश्न पडल्यावर दोघांनीही न्यूझीलंडला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी चांगली असल्यामुळे राहुललाही न्यूझीलंडला जाण्यात अडचण आली नाही.
न्यूझीलंडमध्ये आधी पाच वर्षे एका कंपनीत आणि नंतर २०१७ मध्ये ए अँड झेड बँकेत नोकरी सुरू केली. दरम्यान, राहुलने स्थानिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. नंतर कोरोनाकाळ सुरू झाला. राहुलला दोन मुली आहेत. दाम्पत्याचे घरातूनच काम सुरू होते. असुरक्षित वातावरण असल्यामुळे त्यांनी मुलींसाठी जवळच्या कूक आयलंड या देशात जायचे ठरवले. हे बेट कोविडमुक्त होते. तेथे ए अँड झेड बँकेत नोकरीही मिळाल्यामुळे त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. तेथेही राहुलने क्लब क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. राहुल खेळत असलेला संघ त्यावर्षी स्थानिक स्पर्धेत विजेता ठरला. या विजयात हातभार लागल्यामुळे राहुलचे सर्वत्र कौतुक झाले.  

राहुल ए अँड झेड बँकेत रिलेशनशिप मॅनेजर असल्यामुळे त्याला अनेक जण आधीपासूनच ओळखत होते. क्रिकेटमुळे त्याची ओळख आणखी वाढली. या बेटावर ‘कूक आयलंड न्यूज’ हे वर्तमानपत्र आहे. जगभरात क्रिकेटमध्ये घडामोडी घडत असताना या वृत्तपत्रात क्रिकेटबद्दल काहीच प्रसिद्ध होत नव्हते. त्यामुळे राहुलने संपादकांना भेटून विचारणा केली. ‘तुमच्या पेपरमध्ये क्रिकेटवर कोणीच काही का लिहीत नाही?’ संपादक म्हणाले, ‘येथे कोणालाच क्रिकेट समजत नाही. त्यामुळे कोण लिहिणार हा प्रश्नच आहे.’ त्यावर राहुलने स्वत: क्रिकेटवर लिहिण्याची तयारी दर्शविली. संपादकांनीही आठवडाभर स्तंभ लिहिण्याची परवानगी दिली. राहुलने २०२०-२१ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर टीव्ही पाहून स्तंभलेखन केले. हे लेखन वाचकांच्या पसंतीस उतरले. पहिल्यांदा वृत्तपत्रात क्रिकेट आले आणि स्थानिक व्यक्ती  ते लिहीत असल्यामुळे वाचकांना ते खूप आवडले. त्यामुळे राहुलला प्रसिद्धी मिळाली.

राहुलचे लेखन इतके प्रसिद्ध झाले की, कूक आयलंडचा क्रिकेट संघाच्या थेट प्रशिक्षकपदासाठी त्याला विचारणा करण्यात आली. या संघाला ईस्ट एशिया पॅसिफिक वर्ल्डकप क्वालिफायरसाठी खेळायचे होते. कूक आयलंड क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षाने राहुलला फोन केला आणि म्हणाला ‘तू क्रिकेट खेळतो, क्रिकेटवर लिहितो. तू आमच्या संघाचा प्रशिक्षक होशील ?’ राहुलने त्यांना थेट नाही म्हणून सांगितले. राहुलने दुसऱ्या कोचचा संपर्क त्यांना दिला. त्यानंतर राहुलला व्यवस्थापक होशील का, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने तयारी दाखविली आणि तो पहिल्या दौऱ्यासाठी वानवाटूला जाण्यासाठी सज्ज झाला. कूक आयलंड संघाने येथील सहापैकी तीन सामने जिंकले. या संघाला पहिल्यांदाच ५० टक्के यशस्वी कामगिरी करता आली होती. कधीतरी एखादाच सामना जिंकणारा संघ तीन सामने जिंकून परतत होता. ऑस्ट्रेलियात २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा झाली. या स्पर्धेत वार्तांकन करण्यासाठी राहुलला ॲक्रिडेशन मिळवण्यास वृत्तपत्र व्यवस्थापनाने मदत केली; पण ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी त्याला प्रायोजक मिळवावे लागले. या स्पर्धेत अनेक मोठ्या खेळाडूंसोबत काम करण्याची संधी राहुलला मिळाली. त्यामुळे तो सर्वच खेळाडूंना आता सहकारी समजू लागला. २०२२ मध्ये राहुल कुटुंबीयांसह न्यूझीलंडला परतला आणि तेथे स्पोर्ट्सक्रिक या संकेतस्थळासाठी त्याने लिहिण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडमधील ‘रेडिओ तराणा’ या एकमेव हिंदी चॅनलमध्येही त्याने काम सुरू केले. लोकांनी त्याचेही कौतुक केले. या कार्यक्रमात काल क्रिकेटमध्ये काय झाले, याचा आढावा घेतला जायचा.  भारतातील यंदाची विश्वचषक स्पर्धा राहुलसाठी संस्मरणीय आहे. त्याला बँकेने त्यासाठी आठ आठवड्यांची रजा मंजूर केली आहे. अनेकांकडून त्याला लिहिण्याचे कामही मिळाले आहे. लहानपणी टीव्हीवर पाहिलेल्या खेळाडूंसोबत काम करायला मिळते, यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो! आता हेच काम पूर्णवेळ करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. ‘अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है’, ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातील हा संवाद राहुलचा आवडता संवाद आहे. राहुलच्या क्रिकेट आवडीबाबत हा संवाद अगदी खरा ठरतो. राहुलला त्यासाठी त्याची बायको, मुली, मित्र सगळे जण मदत करतात. या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मी ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी भारतात येऊ शकलो, असेही राहुलने सांगितले. राहुलचे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट समालोचक होण्याचे स्वप्न आहे.

मदतीला धावणारे किवी खेळाडू

किवी खेळाडू खूप आदर देतात, मदत करतात. आता मी एकटा पत्रकार न्यूझीलंडवरून आलो आहे. दुसरा कोणीही पत्रकार नसल्यामुळे त्यांनी खूप आपलेपणाने मला सांभाळून घेतले आहे. त्यादिवशी मी ग्लेन फिलिप्सची मुलाखत घेतली. त्यानंतर संघाची पत्रकार परिषद होती. मला तेथेही जायचे होते. त्यामुळे मला तेथे पोहोचणे शक्य होणार नव्हते. अशावेळी किवी खेळाडूंनी स्वत:च्या ताफ्यातील एका गाडीतून मला तेथे नेले.

Web Title: Solapur to Gahunje via New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.