सोलापूरसाठी नदीत सोडलेले पाणीही जाऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:44+5:302021-05-22T04:10:44+5:30
कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून ...
कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून पाणीची तरतूद नसल्याने एक थेंबही जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून देण्यात आलेले पाणीही बंद पाडण्यात येईल, असा इशारा इंदापूर शेतकरी कृति समितीने दिला आहे.
कळस (ता. इंदापूर) येथे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नाही. मात्र, सोलापूरला ऑक्टोबरनंतर अनधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणीही बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी इंदापूरच्या पाण्यास विरोध करणाऱ्यांचा जोडे मारून व मुंडण करून निषेध केला. सणसर येथेही शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय आंदोलन केले. वडापुरी (ता. इंदापूर) येथील इंदापूर-बावडा रस्त्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन अर्धा तास रास्ता शासनाने फेरविचार करावा, अन्यथा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे अभिजित तांबीले यांनी सांगितले. कळंबमध्ये पाणी रद्दच्या आदेशाचा काळ्या फिती बांधून निषेध करत बोंबाबोंब आंदोलन करून तीव्र आंदोलन पुकारले आहे.