पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना हुसकावणारा ‘सौर पक्षी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:49+5:302020-12-11T04:29:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना हुसकावून लावणाऱ्या ‘पक्षी’ परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने विकसीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांना हुसकावून लावणाऱ्या ‘पक्षी’ परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. सौर उर्जेवर उडणारा हा ‘पक्षी’ वेगवेगळे आवाज करुन वन्यप्राण्यांना घाबरवून सोडतो.
कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ४८ व्या संयुक्त कृषी संशोधन विकास समितीच्या बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी एकूण १८७ संशोधन शिफारशी केल्या. त्यात या सौर पक्ष्याचा समावेश आहे. पिकांवरील किटकांना पळवून लावण्यासाठी केलेला प्रकाशमान किटक सापळाही सौरपक्ष्याप्रमाणेच उल्लेखनीय आहे. यात आवाज करण्याचीही सुविधा आहे. सौर उर्जा, बँटरी किंवा विद्यूत शक्तीवरही ही यंत्रे चालतात.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोले), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहूरी), बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ (कोकण) आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ (परभणी) या चार कृषी विद्यापीठांनी त्यांच्या वार्षिक संशोधनाचे सादरीकरण केले. यातल्या १६१ शिफारशी या तंत्रज्ञान विषयक म्हणजे पीक पद्धती, पाणी वापर, बियाणे या संदर्भातील आहेत. धान्याच्या नवीन वाणांच्या पंधरा शिफारशी आहेत. फळभाज्यांसाठीच्या ३ आणि शेती अवजारांसाठीच्या ८ शिफारशी आहे.
“परिषदेच्या शिफारशी राज्य सरकार कृषी खात्याच्या माध्यमातून वापरात आणते. अवजारांसारखे संशोधन सरकारी किंवा खासगी उत्पादकाकडून उत्पादित करून घेतले जाते,” असे परिषदेचे संचालक (शिक्षण) प्रा. हरिहर कौसडीकर यांनी सांगितले.