आदल्या दिवशी सूर्यग्रहण; तरीही गुढी पाडव्याचा दिवस शुभच, गुढी उभारून करा नववर्षाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 12:14 PM2024-04-07T12:14:15+5:302024-04-07T12:14:46+5:30
नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी मंगळवारचा गुढीपाडव्याचा दिवस उत्तम मुहूर्त
पुणे : गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी अर्थात बुधवारी (दि. ८) सूर्यग्रहण आहे. मात्र ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. तसेच पाडव्याच्या दिवशी वैधृत योग असला तरीही साडेतीन मुहूतापैकी एक असलेला गुढीपाडव्याचा दिवस शुभच आहे. नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ करण्यासाठी मंगळवार (दि. ९) चा गुढीपाडव्याचा दिवस उत्तम मुहूर्त आहे. त्यामुळे घरोघरी गुढी उभारून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे.
गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत, ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे. गुढीला कडूनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जेथे गुढी उभी करावयाची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. अंघोळ करून त्या जागी गुढी बांधावी आणि हळद, कुंकू, फुले वाहून पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी, असे दाते यांनी सांगितले.
सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ३ गुरुपुष्यामृत योग
यंदाच्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण ३ गुरुपुष्यामृत योग आहेत. याशिवाय ६ मे ते २५ जून शुक्राचा अस्त असून, ८ मे ते १ जून या कालावधीत गुरूचा अस्त आहे. त्यामुळे ८ मे ते १ जून या कालावधीत एकत्रितपणे गुरु व शुक्राचा अस्त असल्याने कोणत्याही मंगलकार्यासाठी शुभ मुहूर्त नाहीत, अशी माहितीही मोहन दाते यांनी दिली.