सौर ऊर्जेच्या वापरातून दरमहा पुणे महापालिकेचे वाचताहेत १५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 08:26 PM2019-11-06T20:26:05+5:302019-11-06T20:33:41+5:30
महापालिकेच्या इमारती : एक वषार्पुर्वी केली प्रकल्पाला सुरुवात
पुणे : विजेच्या उत्पादनावर असलेल्या मर्यादा आणि विजेचे न परवडणारे दर यामुळे शासकीय पातळीवर सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. शासकीय इमारतींवर सोलर सिस्टीम बसविण्यासोबतच नागरिकांनाही वारंवार आवाहन करण्यात येत आहे. पुणे महापालिकेने २९ इमारतींवर सौर प्रकल्प बसविले आहेत. यामधून महिन्याला निर्माण होणाºया विजेचा वापर संबंधित कार्यालयांमध्ये केला जात आहे. याचा पालिकेला फायदा झाला असून दरमहा तब्बल १५ लाख रुपयांची बचत होत असल्याचे विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.
केंद्र व राज्य शासनाच्या निदेर्शांनुसार शासकीय इमारतींवर सौर प्रकल्प बसविण्यात येत आहेत. महापालिकेच्या विद्यूत विभागाकडून रेस्को आणि कॅपेक्स या दोन मॉडेलखाली सोलर सिस्टीम बसविण्यात आल्या आहेत. रेस्को मॉडेलच्या नऊ तर कॅपेक्स मॉडेलच्या वीस इमारतींवर हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. एकूण 36 इमारतींवर हे प्रकल्प प्रस्तावित असून अन्य ठिकाणांवरील कामे काही कारणास्तव पुढे सरकू शकलेली नाहीत. महावितरणकडून या प्रकल्पासाठी नेट मिटरींगही करुन घेण्यात येते. काही ठिकाणी ही कामेही पूर्ण झालेली नाहीत.
बालगंधर्व रंगमंदिर, डॉ. नायडू रुग्णालय, घोले रस्ता कला दालन, कमला नेहरु रुग्णालय आदी इमारतींवर बसविलेल्या या सोलर सिस्टीममधून दरमहा साडे चौदा हजार युनिट वीज निर्मिती होत आहे. सौर ऊजेर्तून निर्माण होणारी वीज वापरल्याने महावितरणकडील विजेचा वापर कमी झाला आहे. एरवी महापालिका महावितरणला प्रति युनिटमागे देत असलेल्या रकमेपेक्षा निम्म्याने कमी पैसे सोलर सिस्टीम बसविलेल्या संस्थेला देत आहे. त्यामुळे पालिकेच्या पैशांची बचत होत आहे. यासोबतच शासकीय सुट्यांच्या दिवशी कार्यालय बंद असतात. त्यामुळे निर्माण होणारी वीज महावितरणला दिली जाते. महावितरणला जेवढे युनिट वीज दिली जाते त्याचे पैसेही बिलामधून वजा केले जातात. त्यामुळे पालिकेला त्याचाही फायदा मिळत आहे. मागील वर्षभरापासून हे प्रकल्प पालिकेच्या इमारतींवर सुरु करण्यात आलेले आहेत.