मनपाच्या १४ इमारतींवर ‘सोलर एनर्जी सिस्टीम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:39 AM2018-01-17T05:39:58+5:302018-01-17T05:40:10+5:30
शहरातील वाढत्या लोकसंख्येकडून वीजेची प्रचंड मागणी व पर्यावरणपूरक दृष्टिकोन विचारत घेऊन अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरास चालना देण्यासाठी महापालिकेच्या शहरातील १४ इमारतींवर ‘सोलर एनर्जी सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे.
पुणे : शहरातील वाढत्या लोकसंख्येकडून वीजेची प्रचंड मागणी व पर्यावरणपूरक दृष्टिकोन विचारत घेऊन अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरास चालना देण्यासाठी महापालिकेच्या शहरातील १४ इमारतींवर ‘सोलर एनर्जी सिस्टीम’ बसविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सोलर एनर्जी कॉपॉरेशन आॅफ इंडिया लिमिटेड कंपनीमार्फत पूर्णपणे मोफत ही सिस्टीम विकसित करण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेची दरवर्षी तब्बल १ कोटी रुपयांची बचत होणार आहे.
महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की शहरातील वाढते औद्यागिकरण, रोजगारासाठी स्थलांतरित होऊन शहरात येणारी कुटुंबे, शहराच्या ऐतिहासिक व पर्यटनामुळे स्थलांतरित लोकसंख्या दिवसेंदिवस प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
यामुळे विजेची मागणीदेखील सातत्याने वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने सोलर एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थायी समितीच्या वतीने या प्रस्तावाला मान्यात दिली आहे. यामध्ये केंद्र शासनाने सन २०११ पर्यंत देशात अपारंपरिक ऊर्जास्रोतांतून तब्बल १ लाख ७५ हजार मेगाव्हॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. २
शासनाच्या या चांगल्या योजनेला पाठिंबा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरामध्ये महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या इमारतीवर ‘रूफ टॉप सोलर पी. व्ही. सिस्टीम’ बसवून जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे.