पुणे महापालिकेच्या इमारती झळकणार सौरउर्जेने
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 08:23 PM2018-10-20T20:23:12+5:302018-10-20T20:31:13+5:30
महापालिकेचा विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. अपारंपरिक विजेचे स्रोत निर्माण करण्याकडे त्यामुळे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे.
पुणे : महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सन २०१६ मध्ये जाहीर करण्यात आलेली निविदा प्रक्रिया तब्बल २ वर्षांनी म्हणजे सन २०१८ मध्ये अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या विलंबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सुरूवातीला महापालिकेच्या मुख्य इमारतीवर हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्यासाठीची ही निविदा आहे. यात मुख्य इमारतीच्या टेरेसवर ८२५ किलो वॅट क्षमतेची कनेक्टेड रुफ टॉप सोले पी. व्ही सिस्टिम उभारण्यात येणार आहे. जुलै २०१६ मध्ये ही निविदा मागवण्यात आली होती. त्याला मुदतीत प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ५ कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला. त्यातील ३ कंपन्या सुरूवातीलात अपात्र ठरल्या. जुलै २०१७ मध्ये उर्वरित निविदा खुल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता थेट आॅक्टोबर २०१८ मध्ये प्रशासनाने या निविदांमधून ४ कोटी ९५ लाख रूपयांची सर्वाधिक कमी किमतीची निविदा मान्यतेसाठी म्हणून स्थायी समितीकडे दिली आहे.
महापालिकेचा विजेचा खर्च प्रचंड वाढला आहे. अपारंपरिक विजेचे स्रोत निर्माण करण्याकडे त्यामुळे लक्ष दिले जात आहे. त्यातूनच महापालिकेच्या ३४ इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्याचा विचार पुढे आला आहे. मुख्य इमारतीपासून याला सुरूवात करण्यात येईल. किमान मुख्य इमारतींमधील दिवे या विजेवर चालावेत असे अपेक्षित आहे.
.................
सुरूवातीला यात १० वर्षे देखभालदुरूस्तीची अट होती. ती आता ५ वर्षे करण्यात आली आहे. तरतुद नसल्यामुळे निविदा प्रक्रियेस विलंब झाला. आता निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर अल्पावधीतच काम सुरू होईल. त्यानंतर महापालिकेच्या मालकीच्या अन्य इमारतींमध्येही हा प्रकल्प राबवण्यात येईल.
श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्यूत