कामगार नेत्याला विकले पिस्तुल
By Admin | Published: December 22, 2014 11:34 PM2014-12-22T23:34:30+5:302014-12-22T23:34:30+5:30
अकलुजच्या कंत्राटदारावर बारामतीत दरोडा टाकलेल्या आरोपींना गुन्हेशोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता
बारामती : अकलुजच्या कंत्राटदारावर बारामतीत दरोडा टाकलेल्या आरोपींना गुन्हेशोध पथकाने अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, या आरोपींनी गावठी पिस्तुल, गोळ्या माथाडी कामगारांच्या अध्यक्षाला विकल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी माथाडी कामगार अध्यक्ष सचिन मायचंद पवार (वय ३१, रा. कन्हेरी ) यास देखील अटक केली आहे.
दि. १५ डिसेंबर रोजी दरोडा टाकण्यात आला होता. या गुन्ह्यात अंबादास तायप्पा पवार, त्याचा साथीदार आकाश ऊर्फ अक्षय बापू जाधव, सनी नंदकुमार शिंदे, अमित कल्याण खाडे यांना अटक केली. बारामती शहर व विशेष पोलीस पथकाने त्याचा संयुक्त तपास केला होता. यावेळी अंबादास पवार याने सचिन मायचंद पवार याला गावठी पिस्तुल, ५ गोळ्या जवळपास १ लाख रुपये किमतीला विकला होता. सचिन पवार याच्याकडून पिस्तुल, गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अंबादाससह त्याच्यावर बेकायदेशीर हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना दि. २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अंबादास पवार आणि त्याच्या साथीदाराने एीमआयडीसी परिसरात अनेक गुन्हे केले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील त्यांनी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, डीवायएसपी संभाजी कदम, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी या गुन्ह्या प्रकरणी विशेष लक्ष दिले होते. पोलीस फौजदार गोरख संकपाळ, अण्णा जाधव, हवालदार शिवाजी निकम, अशोक पाटील, अनिल काळे, रविराज कोकरे, संदीप मोकाशी, संदीप कारंडे, मारुती हिरवे, दिलीप सोनवणे, सुधीर काळे, ज्ञानदेव साळुंके, सदाशिव बंडगर या पथकाने या सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)