Raksha Bandhan 2022: "सैनिक हो तुमच्यासाठी", पुण्यातील विद्यार्थी सीमेवरील जवानांना पाठवणार ७५० ग्रिटिंग अन् १००० राख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 15:20 IST2022-08-08T15:19:48+5:302022-08-08T15:20:07+5:30
सैनिक कल्याण संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल सातव यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत

Raksha Bandhan 2022: "सैनिक हो तुमच्यासाठी", पुण्यातील विद्यार्थी सीमेवरील जवानांना पाठवणार ७५० ग्रिटिंग अन् १००० राख्या
वाघोली : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यातील वि. शे. सातव हायस्कूलच्या ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले ७५० ग्रिटिंग कार्ड व १००० राख्या जवानांना पाठवल्या आहेत. सैनिक कल्याण संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल सातव यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत.
पुण्यातील लष्कराच्या दक्षिण कमान या युनिटमार्फत देशभरातील वेगवेगळ्या सैनिकांपर्यंत या राख्या पोहोचवण्यात येणार आहेत. सीमेवरील सैनिकांना राखी पाठवून ‘सैनिको हो तुमच्यासाठी..’ अशी भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी राखीच्या आकारातून ‘इंडिया व जय जवान’ ही शब्दरचना साकारली. देशात घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र कुठलाही सण नाही की उत्सव नाही. देशाची सुरक्षा हेच एकमेव ध्येय व कर्तव्य त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन असो की भाऊबीज असो की रमजान ईद अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहत असतात.
अशा जवानांसाठी प्रेमाचे प्रतीक असलेली राखी पाठवून एक नावीन्यपूर्ण उपक्रम प्राचार्य अजिनाथ ओगले यांच्या संकल्पनेतून साकारला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सैनिकांच्या बद्दल प्रेम, आपुलकी निर्माण व्हावी या भावनेतून हा उपक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. राखी म्हणजे केवळ रेशमी धागा नाही. तर त्या धाग्यात प्रेम आहे, असे उपमुख्याध्यापिका संगीता गायकवाड यांनी म्हटले. या कार्यक्रमासाठी अनिल सातव, उपाध्यक्ष मारुती कुटे, आनंद गोसावी, कल्याण लगड, माजी सैनिक जगदीश सातपुते, आप्पासाहेब पवार, अनिल गायकवाड, शरद सुकाळे, भालचंद्र चाळक, उषा जठार, बिभिषण पवार, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. मंगेश कापसे, छाया कामठे, वैशाली रणसिंग, मंगल चव्हाण, रेश्मा वाघ या शिक्षकांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.