अरुणाचल व पंजाबात सैनिक करणार ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:14 AM2021-08-28T04:14:13+5:302021-08-28T04:14:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : यंदा भारतीय लष्करातील एक आणि सहा मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट ...

Soldiers to be installed in Arunachal and Punjab | अरुणाचल व पंजाबात सैनिक करणार ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

अरुणाचल व पंजाबात सैनिक करणार ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : यंदा भारतीय लष्करातील एक आणि सहा मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्याची इच्छा व्यक्त केली. दगडूशेठ हलवाई न्यासाने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन ‘श्रीं’ची हुबेहूब २ फुटी प्रतीकात्मक मूर्ती नुकतीच अरुणाचल प्रदेश आणि पठाणकोटकडे रवाना केली आहे.

न्यासाचे उपाध्यक्ष सुनील रासने यांनी सैनिकांना ही मूर्ती सुपूर्त केली. ‘एक मराठा बटालियन’चे कर्नल जयकुमार मुदलियार आणि ‘सहा मराठा बटालियन’चे विनोद पाटील यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना सीमेवरील लष्कराच्या ठाण्यात करण्याची इच्छा सैनिकांच्या वतीने व्यक्त केली. न्यासाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांना त्यांनी पत्र पाठविले होते. त्यानुसार मूर्ती रवाना करण्यात आल्या.

कर्नल जयकुमार मुदलियार यांनी पत्रात म्हटले की, “पुण्यातून आमची बटालियन टेंगा व्हॅली, अरुणाचल प्रदेश येथे चीन सीमेवर जात आहे. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतीकात्मक गणेश मूर्तीची स्थापना आम्ही तेथे करू इच्छितो.”

कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले, “सन २०११ पासून ६ मराठा बटालियन आणि दगडूशेठ गणपती न्यासाचे जवळचे संबंध आहेत. पठाणकोट सीमेवर गणेशाची मूर्ती स्थापन केल्याने मराठा बटालियनच्या सैनिकांना वेगळी ऊर्जा मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशामधील सर्व राज्यांतील सैनिक कार्यरत असतात. बाप्पाचा आशीर्वाद सर्व सैनिकांना मिळेल.”

Web Title: Soldiers to be installed in Arunachal and Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.