जवानांची शौर्यगाथा लवकरच अभ्यासक्रमात; लष्करप्रमुख बिपीन रावत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 07:06 PM2017-11-02T19:06:19+5:302017-11-02T19:12:37+5:30

वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या  पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली.

soldiers in curriculum; Information by Army Chief Bipin Rawat | जवानांची शौर्यगाथा लवकरच अभ्यासक्रमात; लष्करप्रमुख बिपीन रावत यांची माहिती

जवानांची शौर्यगाथा लवकरच अभ्यासक्रमात; लष्करप्रमुख बिपीन रावत यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देलष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या १४ शाळा व शिक्षकांचा सत्कारआतापर्यंत २०० विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश

पुणे : भारतीय जवानांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. याबाबत मानव संसाधन मंत्रालयाशी चर्चा सुरू असून, वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. 
बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातील धन्वंतरी सभागृहात लष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या १४ शाळांचा व शिक्षकांचा सत्कार रावत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे उपस्थित होते. 
रावत म्हणाले, ‘‘देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २०० विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश केला आहे.’’
भारतीय जवानांना भेटवस्तू तसेच राख्या पाठवण्याचे बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे, असे सांगून रावत म्हणाले, ‘‘भारतीय लष्करातील जवान हा सीमेवर लढत असतो. २४ तास तो आपले कर्तव्य बजावत असतो. अशा वेळी विद्यार्थ्यांनी पाठवलेली शुभेच्छापत्रे तसेच राख्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एखादा सण साजरा करण्यासाठी कर्तव्यामुळे जवानाला घरी जाता येत नाही. अशा वेळी या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या भेटवस्तूंमुळे देश आपल्या पाठीशी आहे, ही जाणीव या भेटवस्तूंमुळे जवानांमध्ये वाढते. भारतीय सैन्यदल हे धर्मनिरपेक्ष सैन्यदल आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू पाठवताना विविध भाषांचा वापर करत त्यांच्या कल्पनेला वाव द्यावा, असे आवाहनही रावत यांनी विद्यार्थ्यांना केले. या वेळी भारतीय जवानांना जवळपास ७ हजार शुभेच्छापत्रे पाठवण्याचा विक्रम केलेल्या पुण्यातील डीएव्ही स्कूलला ‘फिल्ड मार्शल सॅम मानिकशॉ’ ही फिरती ट्रॉफी रावत यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. 

काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करातर्फे आॅल आऊट मोहीम राबविण्यात आहे. मात्र, ही समस्या चर्चेने सोडवण्यासाठी केंद्र सरकारने माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली आहे. यावर रावत म्हणाले, ‘काश्मीर प्रश्न  सोडवण्यासाठी चर्चेद्वारे ते प्रयत्न करतील, लष्कर मात्र आपले काम सुरूच ठेवेल.’ 

 

भारत-चीन सीमेवर शांतता
डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. सीमेवर सध्या शांतता असल्याचे कार्यक्रमानंतर रावत यांनी पत्रकारांना सांगितले.

 

एल्फिन्स्टनचा ब्रीज लष्करच बांधणार
चेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल ब्रीज लष्कर बांधणार आहे. यावरून सध्या वाद  सुरू आहे. याबाबत रावत यांना विचारले असता ते म्हणाले, एल्फिन्स्टन येथील पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल. चेंगराचेंगरीसारख्या घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी या पुलांचे काम पूर्ण करण्यात येईल. या नंतर लष्करामार्फतच या पुलांचे काम पूर्ण केल्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होईल. 

Web Title: soldiers in curriculum; Information by Army Chief Bipin Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.