सीमेवरील देशाची सुरक्षाव्यवस्था न सोडता जवान करणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 01:51 AM2019-02-28T01:51:59+5:302019-02-28T01:52:07+5:30
निवडणूक आयोग : जवानांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतपत्रिका पाठविणार
- राहुल शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशाच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावणाऱ्या सीमेवरील सैनिकांना वेळेवर मतपत्रिका न पोहोचल्याने अनेकदा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. मतदानासाठी चार दिवसांची सुटी काढणेही अनेकदा शक्य होत नाही. या जवानांसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. यामुळे मतदानासाठी सीमा सोडून परतण्याची गरज आता उरलेली नाही.
पुण्यातल्या सी-डॅक संस्थेच्या मदतीने निवडणूक आयोगाने विशेष प्रणाली तयार केली आहे. त्याद्वारे जवानांच्या मोबाईलवर इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका पाठविली जाणार आहे. यामुळे पोस्टाने मतपत्रिका पाठविण्यात जाणारा वेळ वाचणार असून प्रत्येक सैनिक मतदानाचा करू शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सेवेमुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावू न शकणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आणि सीमेवरील जवानांना सध्या पोस्टल मतदानाचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले कर्मचारी एकाच जिल्ह्यात असल्याने पारंपरिक पद्धतीने पोस्टल मतदान करणे त्यांना शक्य होते. परंतु, सीमेवर तैनात जवानांना पोस्टल पद्धतीने मतदान करण्यात अनेक अडचणी येतात.
पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविणे आणि पोस्टाकडून ही मतपत्रिका परत मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यात बराच कालावधी जातो. मतमोजणीच्या तारखेपर्यंत मतपत्रिका मतदान केंद्रापर्यंत न पोहोचल्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळे इलेक्टॉनिक पद्धतीने मतपत्रिका पाठविण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
या प्रत्येक मतपत्रिकेला बारकोड असणार आहे. पोस्टाद्वारे येणाºया पाकिटावरही बारकोड दिला जाईल. सी-डॅकच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सैनिकांच्या मोबाईलवर पाठविली जाईल. मोबाईलवर पीन नंबर (युनिक कोड) दिला जाणार असल्याने बोगस मतदान होणार नाही.
मोबाईलवर पाठविलेली इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका संबंधित जवान मतदाराला डाऊनलोड करून घेता येईल. इलेक्ट्रॉनिक मतपत्रिकेद्वारे मतदान करणारा मतदार तोच आहे, याबाबतच्या खात्रीसाठी सक्षम अधिकाºयाकडून घोषणापत्र घेतले जाईल.
या घोषणापत्रावरही बारकोड असले. त्यामुळे या मतपत्रिकांची मोजणी करताना अडचण येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
लाभ कोणाला
पोस्टल किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणाºया मतदानासाठी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांची नोडल आॅफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. जवान व त्यांच्या पत्नीला इलेक्ट्रॉनिक मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. पुणे जिल्ह्यात असे ४ हजार ७५८ मतदार आहेत. लष्करातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, सीआरपीएफचे जवान, एसआरपीएफचे जवान यांचा यात समावेश आहे.
सैनिकांना आपला हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने नवीन संधी उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर अंतिम मतपत्रिका तयार होते. त्यानंतर ‘पोस्टल बॅलेट जनरेट’ सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार झालेली इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका सी-डॅकच्या मदतीने पाठविली जाईल.
- सुनील गाडे, उपजिल्हाधिकारी