कागदावर सोडवा ऑनलाइन परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:40+5:302021-02-15T04:10:40+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या मार्च महिन्यापासून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या मार्च महिन्यापासून प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. त्यात ५० गुणांसाठी एमसीक्यू प्रश्न आणि २० गुणांसाठी लेखी स्वरूपातील प्रश्न विचारणार आहेत. विद्यार्थ्यांना एका कागदावर प्रत्येकी ५ गुणांच्या चार प्रश्नांची उत्तरे लिहून तो कागद अपलोड करावा लागणार आहे. परंतु, विद्यार्थी हा पर्याय कितपत स्वीकारतात; हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेचा पर्याय स्वीकारला आहे. विद्यापीठाशी संलग्न तब्बल ७ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेऊन त्यांच्या ३० ते ३१ लाख उत्तरपत्रिका तपासणे तत्काळ शक्य नाही. त्यामुळेच विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेचा पर्याय स्वीकारला असून परीक्षेसाठी ७०/३० चा पर्याय स्वीकारला आहे. त्यात ७० गुणांमध्ये ५० गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. तर २० गुणांसाठी लेखी स्वरूपातील विचारले जातील. आता विद्यार्थ्यांना एमसीक्यू पद्धतीने परीक्षा देण्याची सवय झाली आहे. मात्र, कागदावर किंवा ऑनलाइन पद्धतीने सविस्तर लेखी उत्तर लिहून दिलेल्या क्यूआरकोडचा वापर करून अपलोड करण्याची पद्धत विद्यार्थ्यांसाठी नवी असणार आहे.
विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षेच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन उत्तरे लिहून घेतली जाणार आहेत. तसेच त्याचे मूल्यांकनही ऑनलाइन पद्धतीनेच करणार आहे. याबाबत विद्यापीठातर्फे तीनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कार्यशाळा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेबाबत आवश्यक माहिती मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला या पद्धतीने परीक्षा देण्याचा सराव करता यावा; यासाठी पुढील काही दिवसांत मॉक टेस्टची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
---
विद्यापीठातर्फे नव्या पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तीनही जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणतीही अडचण येणार नाही; यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची मॉक टेस्ट घेण्याबाबत लक्ष दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही परीक्षा सहजपणे देता येईल.
- डॉ. संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, पुणे विद्यापीठ