समस्या सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:13 AM2021-02-24T04:13:10+5:302021-02-24T04:13:10+5:30
मार्केट यार्डातील भुसार विभागातील रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून याकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका ओस्तवाल यांनी पत्रकार ...
मार्केट यार्डातील भुसार विभागातील रस्ते, पाणी, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असून याकडे लक्ष द्यावे, अशी भूमिका ओस्तवाल यांनी पत्रकार परिषदेत मांडली. या वेळी मर्चंट्सचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती, प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, सहसचिव अनिल लुंकड उपस्थित होते.
पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, मर्चंट्सतर्फे वेळोवेळी प्रशासनाकडे भुसार विभागातील विविध समस्यांचा पत्रव्यवहार केला. या पत्राची यादी पालकमंत्र्यांना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष भेटू घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार करणार आहे. पाठपुरावा करूनही व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच भुसार व्यापाऱ्यांना प्रशासकाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
बाजारातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून व्यापाऱ्यांना वायफायची सुविधा देण्याची केलेली घोषणा कागदावरच आहे. बाजार समितीने बांधलेली स्वच्छतागृह वापरण्याऐवजी त्यांना कुलूप लावून ठेवली आहेत. त्याचप्रमाणे बाहेरून येणाऱ्यांसाठी बांधलेल्या पाणपोईचा वापर अद्याप सुरू केलेला नाही. बाजार आवारात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप सुरू झाले नाहीत, असेही ओस्तवाल यांनी सांगितले.
प्रवीण चोरबेले म्हणाले, की व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासनाकडे वेळ नाही. सकाळी प्रशासनाचे अधिकारी बैठकांमध्ये असतात, तर दुपारनंतर ते बाजार समितीच्या कार्यालयातच नसतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दाद कोणाकडे मागावी. त्यामुळे बाजार समितीला पूर्णवेळ प्रशासक नियुक्त करणे गरजेचे आहे.
---
रस्त्याच्या कामाची चौकशी करा
भुसार विभागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २०१८ मध्ये सुमारे १६ कोटींच्या कामाची निविदा काढली होती. परंतु, अद्याप रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाहीत. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहतूककोंडी होत असून त्याचा व्यापारावर परिणाम होत आहे. तसेच काम पूर्ण होण्यापूर्वी ठेकेदाराला सुमारे १२ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत पूना मर्चंट्स चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी केली.