बॅकलाॅग परीक्षेतील अडचणी सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:27+5:302020-12-07T04:08:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षातील बॅकलाॅग आणि श्रेणी सुधार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ष ते अंतिम पूर्व वर्षातील बॅकलाॅग आणि श्रेणी सुधार परीक्षेसाठी उपलब्ध केलेली सराव परीक्षा देताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत अडचणी आल्यानंतरही विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे पुन्हा नुकसान होणार असेल तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न महाराष्ट्र स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनने उपस्थित केला आहे.
पुणे विद्यापीठातर्फे बॅकलाॅगच्या व श्रेणीसुधारची ऑनलाइन परीक्षा येत्या ८ डिसेंबरपासून घेतली जाणार आहे. विद्यापीठाने ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेतली. त्यामध्ये लाॅगइन न होणे, प्रश्नांचे पॅनल न दिसणे, फ्रंट कॅमरा आपोआप बंद होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून केल्या जात आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा घेताना झालेल्या गोंधळाची पुनरावृत्ती झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार ? असा प्रश्न विद्यार्थी संघटनेने उपस्थित केला तसेच तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागू नये, यासाठी ही परीक्षा नाॅन प्राॅक्टर्ड पद्धतीने घ्यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशनतर्फे कुलगुरूंना दिले आहे.