जिल्ह्यातील वाहतूक समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:58 PM2018-08-30T23:58:57+5:302018-08-30T23:59:14+5:30
पाटील यांची सूचना : जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक
पुणे : वाहनांची वाढती संख्या, अपूरे रस्ते यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. सर्व संबधित यंत्रणांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात व वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवारी दिल्या.
शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. याप्रसंगी खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, परिसर संरक्षण संवर्धन समितीचे अध्यक्ष रणजीत गाडगीळ, ग्राहक सेवा संस्थेचे धनंजय वाठारकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून पादचाठयांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे अनिल शिरोळे यांनी सांगितले. तर रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या निदेर्शाचे पालन संबधित यंत्रणांना प्राधान्याने करावे, अशी सूचना खासदार अमर साबळे यांनी केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील ब्लॅॅक स्पॉटसंबधी उपाययोजना करणे, राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव महामार्गावरील वाहतूक समस्या सोडविणे, वाहतूककोंडी टाळण्यासाठी स्वयंसेवकांची अतिरिक्त कुमक नेमणे, रस्त्यावरील दिशादर्शक व रिफ्लेक्टर्सची दुरुस्ती करणे, महामार्गावरील खड्डयांची दुरुस्ती करणे, रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक समस्या सोडविणे, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक असुविधा दूर करणे आदी विषयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच सर्व संबधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून वाहतूकीच्या समस्या दूर कराव्यात, अशा सूचना दिल्या.