काहींची दिवाळी, तर काहींचे दिवाळे
By admin | Published: October 21, 2014 05:12 AM2014-10-21T05:12:31+5:302014-10-21T05:12:31+5:30
नातेवाईक - मित्रपरिवाराकडून उसनवारीपासून ते मालमत्ता विकण्यापर्यंत आणि दागिने गहाण ठेवण्यापर्यंतच्या निवडणुकीतील सुरस कहाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे
पुणे : नातेवाईक - मित्रपरिवाराकडून उसनवारीपासून ते मालमत्ता विकण्यापर्यंत आणि दागिने गहाण ठेवण्यापर्यंतच्या निवडणुकीतील सुरस कहाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च झाला. चौरंगी - पंचरंगी लढतीत काहींची लॉटरी लागली, त्यांची दिवाळी साजरी होतेय, मात्र पराभव झालेल्यांचे दिवाळे वाजले आहे.
दर पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका या राजकीय नेत्यांच्या दृष्टीने एक युद्धच असते़ ते सर्व शक्तीनुसार लढविताना केवळ विजय मिळवायचा या एकमेव ध्येयाने प्रत्येकजण साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांचा अवलंब करीत असतो़ त्यात अनेकदा त्यांना स्वकियांकडूनच अडथळे येतात़ यंदाच्या निवडणुकीतही हे दिसून आले. त्यामुळे अनेक उमेदवारांकडून झालेला खर्च आणि प्रत्यक्षात मिळालेली मते यांचे गणित कोठेच जुळत नसल्याचे दिसत असल्याने मनस्तापाची वेळ आली आहे.
आघाडी आणि युतीमुळे अनेक मतदारसंघातील आमदारकीच्या इच्छुकांना आपल्या आकांक्षांना मुरड घालावी लागत होती. क्षमता असूनही आघाडीच्या राजकारणात लढण्याची संधी मिळत नव्हती. पण, निवडणुकीचे अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच आघाडी आणि युती तुटली़ त्यामुळे या इच्छुकांना पर्याय मिळाला. आमदारकीचे स्वप्न समोर दिसू लागल्याने अनेकांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला़ जवळ आलेली दिवाळी लक्षात घेऊन पणत्या, सुवासिक साबण, उटणे अशा वस्तू मतदारांना पुरविल्या़ कार्यकर्त्यांना जपताना अनेकांनी चांदीच्या भेटवस्तूही दिल्या़ काहींनी ब्रेसलेटही पुरविली़ प्रचारात त्यांना कोठेही कमी पडू नये, म्हणून त्यांची बडदास्त ठेवली़ कार्यकर्त्यांच्या मागण्याही वाढत होत्या. दररोजचा भत्ता वाढवून देण्याची मागणी होत होती.
संपूर्ण प्रचारात एका उमेदवाराचा प्रचार करत असताना मतदानाच्या दिवशी मतदान प्रतिनिधी म्हणून दुसरा उमेदवार अधिक पैसे देत असल्याचे पाहून त्याचे काम करण्यासही पुढे - मागे पाहिले नाही़ (प्रतिनिधी)