काहींना गवगवा करण्याचीच हौस
By admin | Published: April 26, 2017 03:58 AM2017-04-26T03:58:39+5:302017-04-26T03:58:39+5:30
काही लोकांना थोडे काम केले तरी दुनियेत गवगवा करण्याची हौस असते. पण मला ते योग्य वाटत नाही. अजमल कसाब आणि अफजल गुरू यांना
पुणे : काही लोकांना थोडे काम केले तरी दुनियेत गवगवा करण्याची हौस असते. पण मला ते योग्य वाटत नाही. अजमल कसाब आणि अफजल गुरू यांना फाशी दिल्यानंतर त्याबाबत मी कधीही बोललो नाही, अशी टिप्पणी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. पोटविकारतज्ज्ञ डॉ. विनय थोरात यांना शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह व नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, प्रतिभा थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
उल्लेखनीय काम करणारे संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
डॉ. एकबोटे यांनी ‘शिंदे यांनी अफजल गुरू आणि कसाबला फाशी दिल्याबद्दल कधीही पाठ थोपटून घेतली नाही. काही लोक थोडे काम केले तरी त्याचे मार्केटिंग करतात,’ असे सांगितले. त्याचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, ‘‘त्यांनी जे कृत्य केले त्याची शिक्षा त्यांना मिळाली. मी सच्चा देशभक्त आहे. सत्ता येते जाते; पण या वेळी तुम्ही काय काम करता, हे महत्त्वाचे असते. काहींना थोडे काम करून दुनियेला सांगायची हौस असते. मला ते योग्य दिसत नाही. राजकारणात सगळे भांडून मिळत नाही. ध्येयवादाने पुढे जात राहिले तर आपोआप सगळे मिळते.’’
(प्रतिनिधी)