Temperature: पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत उन्हाचा चटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:12 AM2023-02-10T10:12:25+5:302023-02-10T10:13:46+5:30

फेब्रुवारीच्या सुरुवातीला गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तसेच राज्याच्या अनेक शहरांमध्ये कमाल तापमानात वाढ

Some parts of the state including Pune will experience scorching heat till the end of February | Temperature: पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत उन्हाचा चटका

Temperature: पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत उन्हाचा चटका

googlenewsNext

पुणे : गेल्या आठवडाभरापासून दुपारच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. पुढील दोन दिवस अशीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर तीन-चार दिवस कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुण्यासह राज्याच्या काही भागांमध्ये फेब्रुवारीअखेरपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यात १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या काही भागात विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे कमाल व किमान तापमानात घट होईल, अशी माहिती हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.

हवामान विभागाच्या वेळापत्रकानुसार, उन्हाळा अधिकृतपणे मार्चपासून सुरू होतो; परंतु सध्या फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तसेच राज्याच्या अनेक शहरांमध्ये कमाल तापमानात वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी राज्यात सर्वाधिक तापमान रत्नागिरी येथे ३७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. त्याखालोखाल सोलापूर येथेही ३५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर विदर्भातही अनेक शहरांमध्ये तापमान ३३-३४ अंशांच्या दरम्यान होते.

काश्यपी म्हणाले, ‘उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पुण्यात व राज्यातील बहुतांश शहरांमधील दिवसाचे तापमान आधीच वाढू लागले आहे. कोरड्या हवामानामुळे तसेच दिवसा स्वच्छ आकाश, यामुळे सौर किरणे थेट पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत असल्याने दिवसाचे तापमान वाढले आहे. राज्याच्या काही भागात उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला आहे, ज्यामुळे कमाल तापमानातही वाढ झाली आहे. शिवाय वाऱ्याच्या कमी वेगामुळे उष्णतेचे घटकही वाढले आहेत.’

शहरातील तापमान 

पुण्यातही कमाल तापमान ३४.२ अंश सेल्सिअस होते. लवळे येथे कमाल तापमान ३६.९, मगरपट्टा ३५.२, चिंचवड ३५.९, पाषाण ३४.४ तर लोहगाव येथेही ३३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. या बहुतांश भागांमध्ये कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन अंशांची वाढ दिसून येत आहे. शहरात येत्या दोन दिवसांत तापमान ३३ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमाल व किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. किमान तापमान ९ अंशांपर्यंत उतरून पुन्हा थंडी जाणवेल.

Web Title: Some parts of the state including Pune will experience scorching heat till the end of February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.