अभ्यास नको म्हणून कोणी तर, कोणी पोटासाठी ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:15 AM2021-08-24T04:15:07+5:302021-08-24T04:15:07+5:30
दोन वर्षांत पुणे स्थानकावर सापडली ९८२ मुले : झारखंड, बिहारमधली सर्वाधिक प्रसाद कानडे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या ...
दोन वर्षांत पुणे स्थानकावर सापडली ९८२ मुले : झारखंड, बिहारमधली सर्वाधिक
प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या दोन वर्षांत पुणे रेल्वे स्थानकावर ९८२ अल्पवयीन मुले सापडली. यातील बहुतांश मुले घरच्या आर्थिक परिस्थितीला गांजून पोटासाठी घर सोडून पळाली. घरी मारहाण होत असल्याने काहींनी पळ काढला, तर काहींना अभ्यासाचा कंटाळा असल्याने घराला रामराम करून पुणे गाठले. पुणे स्थानकावर आढळलेल्या मुलांमधली सर्वाधिक झारखंड व बिहारातून आलेली आहेत.
पुणे स्थानकावर सध्या रोज जवळपास १७० ते १८० प्रवासी रेल्वे येतात. बहुतांश गाड्या उत्तर भारतातून पुण्यात दाखल होतात. कोरोनामुळे प्रवासी संख्या कमी असली तरी रोज जवळपास ६० ते ७० हजार प्रवाशांची वर्दळ येथे असते. यात घरून पळून आलेली मुलेही असतात. तिकिटासाठी पैसे नसतील तर जनरल डब्यांत बसून ही मुले पुण्यात येतात. स्थानकाच्या परिसरातील छोटी-मोठी हॉटेल, टपऱ्या, दुकाने येथे दिवसभर काम करून रात्री झोपायला पुन्हा स्थानकावरच येतात. अशा वेळी स्थानकावरील आरपीएफ व चाईल्ड लाईनचे कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना घरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
बॉक्स १ : स्थानकावर सापडले मुले-मुली
२०१९ - २०२० : ८७६
२०२० - २०२१ : १०६
दोन्ही वर्षाचे मिळून ९८२ मुले-मुली सापडले.
बॉक्स २
पैसा कमविण्यासाठी व मार टाळण्यासाठी
पुणे स्थानकावर सापडलेली बहुतांश मुलांनी आर्थिक तंगीमुळे काम मिळवण्यासाठी घर सोडून पुणे गाठले आहे. काही मुलांना आई किंवा वडील नसतात, काहीवेळा दोघेही नसतात, अशावेळी इतर नातेवाइकांकडून शाररीरिक, मानसिक छळ होतो. घरात सतत मारझोड, जेवायला न देणे यामुळे मुले घर सोडतात. काहींना फूस लावूनही पळवून आणले जाते. घरच्यांकडून अभ्यासाचा तगादा लावल्यामुळेही घर सोडल्याची उदाहरणे आहेत.
बॉक्स ३
मुलांना शोधण्यासाठी २४ तास गस्त
साथी-पुणे रेल्वे चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक पुणे स्थानकावर २४ तास तीन पाळ्यांमध्ये गस्त घालत असतात. कुणी मुलगा रडत असेल, कुणी भीक मागत असेल, कोणी एकटाच फिरत असेल तर त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांना विश्वासात घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली जाते. नंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडून त्यांच्या पालकाकडे सुपूर्द करण्यात येते.
कोट :
साथी-पुणे रेल्वे चाईल्ड लाईनचे स्वयंसेवक हे दिवसरात्र मुलाच्या संरक्षणासाठी त्यांचा शोध घेतात. दोन वर्षांत ९८२ मुलांना आम्ही सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे दिले.
-रोहित दुबे, समन्वयक, साथी-पुणे रेल्वे चाईल्ड लाईन, पुणे स्थानक