Maharashtra lockdown Pune rules पुणेकरांना काहीसा दिलासा. आता काय काय राहणार सुरू पाहा एका क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 07:32 PM2021-04-06T19:32:24+5:302021-04-06T19:37:24+5:30
राज्या पाठोपाठ पुण्यासाठी नवीन नियमावली जाहीर
राज्य सरकार पाठोपाठ पुणे महापालिकेने सुद्धा सुधारित आदेश काढत आणखी काही सुविधांना शहरात परवानगी दिली आहे. आधीच्या आदेशानुसार अनेक अत्यावश्यक सेवा मध्ये मोडणाऱ्या सेवांना परवानगी देण्यात आली नव्हती. पण आता मात्र त्या सेवांचा समावेश नव्या आदेशात करण्यात आलेला आहे. या सेवांना सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये सुविधा पुरवता येतील तर काही अत्यावश्यक सेवांना पूर्णवेळ सुरू राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.
नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेमध्ये पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, कुरिअर सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्विस प्रोव्हायडर, माहिती-तंत्रज्ञान यांच्याशी निगडित सेवा देणाऱ्या कंपन्या, सुरक्षा सेवा, फळ विक्रेते , नॉनव्हेज ची दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने, पेट शॉप, पाळीव प्राणी संगोपन केंद्र यांचा समावेश करण्यात आला आहे.
याबरोबरच खासगी कार्यालयांमध्ये परवानगी असणाऱ्या कार्यालयांमध्ये सेबीची सर्व कार्यालय, रिझर्व बँकेची संबंधित संस्था, वित्तीय महामंडळे, कस्टम हाऊस एजंट औषधे औषधांची संबंधित वाहतूक करणारी परवानाधारक ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, मायक्रो फायनान्स संस्था यांना सर्व दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात त्यांची कार्यालय चालू ठेवता येतील.
अधिकृत तिकीट असलेल्या नागरिकांना घरातून स्थानकापर्यंत तसेच स्थानकापासून घरापर्यंत प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. याला वेळेचे कोणतेही बंधन नाही.
औद्योगिक कंपन्यांची खासगी बसेस आणि वाहने यांना संचार बंदीच्या काळात प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.
धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी याठिकाणी पूजा-अर्चा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे तसेच या ठिकाणी विवाह किंवा अंत्यविधी संबंधित कार्यक्रमास मर्यादित लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाण्याची मुभा नवीन नियमावली मध्ये देण्यात आलेली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना शाळा-कॉलेजमध्ये जाता येईल.
लग्नकार्यासाठी आता पोलिसांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खाजगी वाहने आणि खासगी बसेस यांना सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळात परवानगी देण्यात आली आहे मात्र आमच्या काळात खासगी वाहनांना रस्त्यावरती प्रवेश मिळणार नाही.
बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा या नव्या नियमावलीत दिलासा देण्यात आलेला आहे. बांधकाम व्यावसायिकांचे साईट ऑफिस तसेच आर्किटेक्टचे ऑफिस आता सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरु राहू शकेल.