काही आदिवासी कुटुंबे कागपत्रांअभवी अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:12 AM2021-08-22T04:12:35+5:302021-08-22T04:12:35+5:30
लॉकडाऊनकाळात अनेकांचा रोजगार बुडाल्याने आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. हातावर पोट असणाऱ्या कातकरी कुटुंबाची अवस्था अत्यंत बिकट झाली ...
लॉकडाऊनकाळात अनेकांचा रोजगार बुडाल्याने आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. हातावर पोट असणाऱ्या कातकरी कुटुंबाची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. त्यामुळे खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी अनेक आदिवासी संघटनांनी शासनाकडे व आदिवासी विकास विभागाकडे केली होती. त्याची दखल घेत आदिवासी वस्तीवर जाऊन अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात आले. त्यामुळे लाभार्थींचे चेहरे समाधानाने फुललेले दिसत होते.
या किटमध्ये तांदूळ, डाळी, चवळी, वाटाणा, तेल, मीठ, मिरची, साबण अशा वस्तू आहेत. यामुळे गरीब आदिवासी कुटुंबांची चूल पेटणार असल्याने काही दिवसांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले. येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मुकणे यांनी वस्तीवरील बिकट समस्यांचा पाढाच उपस्थितांसमोर वाचला. रस्ता, लाईट, पाणी, निवारा यांसारख्या मूलभूत सुविधाही अजून वस्तीवर पोहोचल्याच नाहीत. चाकणसारख्या औद्योगिक व विकसित पट्ट्यात अशा प्रकारची वस्ती असेल यावरही अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण, अनंत समस्यांचा सामना करत हे आदिवासी कातकरी आला दिवस ढकलत जीवन कंठत आहेत.
आम्हाला किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात, राहण्यासाठी घरकुल व शासनाच्या योजना विनाअट मिळाव्यात, तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी अनेक महिलांनी व्यक्त केली. कागदपत्रांअभावी येथील दहा-बारा कुटुंबे खावटी अनुदान योजनेपासून वंचित असल्याचे शिवाजी मुकणे यांनी सांगितले. अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यासाठी पठारवाडी शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मोहरे, सामाजिक कार्यकर्ते कयूम पठाण, समन्वयक अधिकारी अविनाश बिरादार, दादासाहेब कदम यांनी केले.
210821\img-20210820-wa0022.jpg
फोटो - चाकण पालिका हद्दीतील आदिवासी कातकरी लोकांना खावटी किराणा किट वाटप.