कुठे बाराशे तर कुठे अडीज हजार; पाणीटंचाई भेडसावत असलेल्या पुणेकरांसमोर टँकरचा काळाबाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 01:30 PM2023-05-08T13:30:51+5:302023-05-08T13:31:03+5:30
महापालिकेकडून पाणी घेऊन ते तिप्पट ते चौपट दराने विकण्याचेही प्रकार सुरू; महापालिकेचे मात्र दुर्लक्ष
पुणे : ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरला शहरात मागणी वाढली असल्याने टँकरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात पाण्याच्या टँकरसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी १ हजार ३००, काही भागात १ हजार ५०० रूपये तर काही ठिकाणी २ ते २ हजार ५०० हजार रुपयांना नागरिकांना टँकर विकत घ्यावा लागत आहे. वापरण्याच्या पाण्याचा टँकरही ७०० ते ८०० रुपयांना मिळत आहे. पाणीटंचाई भेडसावत असलेल्या भागात टँकरचा काळाबाजारही सुरू झाला असून, महापालिकेकडून पाणी घेऊन ते तिप्पट ते चौपट दराने विकण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत. मात्र या प्रकाराकडे पालिका दुर्लक्ष करत आहे.
महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर पालिकेचे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले व खासगी अशा तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात. पालिकेच्या टँकरसह खासगी टँकरलाही मागणी वाढली आहे. महापालिकेकडून कमी दराने टँकर भरून अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये चढ्या दराने पाणी दिले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी पालिकेच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो.
सोसायटीनुसार ठरतात टँकरचे दर
एखाद्या सोसायटीला ज्या टँकरचालकाने पाणी दिले असेल त्यानेच त्या सोसायटीला पाणीपुरवठा करायचा इतर ठेकेदाराला या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यास मज्जाव केला जातो. यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना टँकर ठेकेदाराला मागेल त्या दराने टँकर घ्यावा लागतो. खासगी टँकर चालकांकडून महापालिका ६३४ ते १ हजार ४०८ रूपये या दरम्यान शुल्क आकारते. खासगी टँकरचालक नागरिकांकडून एका टँकरसाठी अंतरानुसार १ हजार ३०० ते २ हजार ५०० रूपये घेत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा सोसायटी पाहून टँकरचे दर आकारले जात असल्याचे समोर आले आहे.
येथे वाढल्या टँकरच्या फेऱ्या
सध्या टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, लोहगाव, खराडी, विमाननगर, कात्रज व परिसर, वारजे, पौड रस्ता, पाषाण, कोंढवा आदी उपनगरांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काही खासगी टँकरचालक महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवरून पाणी घेतात तर काही टँकर समाविष्ट गावांमध्ये असलेल्या खासगी विहिरी, बोअरवेलमधूनही टँकर भरून घेतात. पालिकेच्या भरणा केंद्रावर मोठी रांग असल्याने सध्या अशा सर्व विहिरींवरून टँकर भरणा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
पुणे महापालिकेच्या टँकर पाॅइंटवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र वडगावशेरी येथील टँकर पाॅइंटवरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.
पालिकेचा दहा हजार लिटरचा टँकर ८८२ रुपयांना
ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी पालिकेच्या वतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो. पण पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा दहा हजार लिटरपर्यंतचा टँकर मागविण्यात आला तर त्यासाठी ८८२ रूपये दर आकारला जातो.
महापालिकेच्या पाससाठी टँकरचे पाण्याचे दर
महापालिकेच्या टँकर पाॅइंटवरून खाजगी टँकरचालक पाणी भरतात. त्यांना महापालिका पास देते. या खाजगी टँकरकडून १० हजार लिटर्ससाठी ६३४ रूपये, १० हजार लिटर्स ते १५ हजार लिटर्सला ९९९ रूपये आणि १५ हजार लिटर्सपेक्षा जास्त क्षमतेसाठी १ हजार ४०८ रूपये दर आकारला जात आहे.
''वडगावशेरी येथील टँकर पाॅइंटच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील सीसीटीव्ही कॅमरे बंद आहेत. खाजगी टँकर्स चालक पालिकेच्या टँकर पाॅइंटवरून पाणी भरत असतील. त्यांच्या विषयी तक्रार आली तर पालिका निश्चितपणे कारवाई करत आहे. - अनिरुद्ध पावसकर, विभागप्रमुख, पाणीपुरवठा पुणे महापालिका''