खेळ कुणाला दैवाचा कळला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:07 AM2018-07-24T01:07:47+5:302018-07-24T01:08:08+5:30
२४ वर्षांनंतर झीनत अम्मीला भेटते तेव्हा; मायलेकींचा घडला शब्दाविना ‘बोलका’ संवाद
- युगंधर ताजणे
पुणे : इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडते हे गुगलला टिचकी मारण्याचा अवकाश की ते क्षणात समजते. हे जरी खरे असले, तरी सव्वा वर्षाची असताना स्पेनला गेलेल्या झीनत भारतात राहणाºया आपल्या अम्मीचा शोध घेते. प्रत्यक्षात तिची आणि अम्मीची तब्बल २४ वर्षांनंतर भेट होते. ऐकायला जरी हे नवल वाटत असले तरी अशावेळी दैवाचा खेळ किती अजब असू शकतो याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. जन्मदात्रीला भेटल्यानंतर भावना व्यक्त करण्यासाठी भाषा अडसर न ठरता केवळ नजर आणि स्पर्शाच्या माध्यमातून घडलेला त्या मायलेकींचा तो संवाद विलक्षण ‘बोलका’ होता.
झीनतच्या आईच्या वाट्याला लग्न होण्यापूर्वीच मातृत्व आले. नात्यातीलच एकाने लग्नाच्या आणाभाका देऊन फसवले. दिवस गेलेल्या झीनतच्या अम्मीला काही करुन मुलीला जन्म द्यायचा होता. तिने धाडसाने निर्णय घेतला. मात्र पुढे परिस्थितीनुसार तिला मुलीकडे फारसे लक्ष देणे जमत नसल्याने तिने मुलीला शहरातील सोफोश या संस्थेत ठेवले. खरं तर तिला मुलीला स्वत:जवळ ठेवायचे होते. एवढेच नव्हे तर कुणाला दत्तक देण्याचा देखील तिचा विचार नव्हता. प्रत्यक्षात आज झीनतला ज्यावेळी बघितले त्यावेळी आपण काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय बरोबर असल्याची भावना ती व्यक्त करते. स्पेनच्या अँटिच रमन आणि ग्रेसिया फोर्स या दाम्पत्याने तिला दत्तक घेतले. आईची एक इच्छा होती आपल्या मुलीचं नाव झीनत राहु देण्याची. ती त्यांनी मान्य करत ते एक वर्ष आणि चार महिन्याच्या झीनतला डिसेंबर १९९४ साली स्पेनला घेवून गेले. आता झीनत २४ वर्षांची असून तिचे स्पेनमधील नाव ‘मिराया’ असे आहे. तिने दोन्ही नाव तशीच ठेवली आहेत. आपल्या जन्मदात्या आईचा शोध घ्यावासा वाटला. काही करुन तिला भेटण्याची ओढ झीनतला स्वस्थ बसु देईना. तिचे पाय भारताकडे वळले. सोफोशच्या मदतीने तिच्या प्रयत्नांना यश आले. ज्यावेळी मायलेकींची पहिली भेट झाली. तेव्हा दोघींही बराच वेळ एकमेकींकडे बघत होत्या. अम्मी हिंदीत तर मुलगी इंग्रजी - स्पॅनिश भाषेत बोलायची. नंतर मात्र शब्दांची बंध गळुन पडला. अम्मीने झीनता चेह-यावरुन हात फिरवताच झीनतने तिच्या कुशीत शिरुन आपल्या अश्रुंना मोकळी वाट क रुन दिली.