शुक्राच्या चांदणीवर राहते कोणीतरी? फॉस्फीन वायू आढळल्याने सुरू झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 02:18 AM2020-09-17T02:18:05+5:302020-09-17T06:17:10+5:30
संशोधनविषयक ‘नेचर’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू आढळल्याचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
पुणे : शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू आढळल्याने येथे जीवसृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या समूहाने नुकताच केला आहे. त्यामुळे ‘परग्रहावरील जीवसृष्टी’ हा मानवी कुतूहलाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, शुक्र ग्रहावरील तप्त आणि रसायनयुक्त वातावरणात कोणते सजीव जिवंत राहू शकतात, फॉस्फीन वायू कोणत्या कारणामुळे शुक्रावर आला याचा सखोल अभ्यास व्हायला हवा, असे मत खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
संशोधनविषयक ‘नेचर’ या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू आढळल्याचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. शुक्रावरील सूक्ष्म जीवजंतूंनीच हा वायू वातावरणात सोडला असावा, असा दावा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या समूहाने केला आहे. या संशोधनामुळे शुक्रावर जीवसृष्टी असल्याच्या चर्चेला तोंड फुटले.
शुक्र ग्रहापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील वातावरणात फॉस्फीन वायू आढळून आला आहे. हा वायू सूक्ष्म जीवांकडून सोडला जातो किंवा त्याची निर्मितीसुद्धा करता येऊ शकते. शुक्र ग्रहावर हा वायू कोणत्या कारणाने आढळला असावा, याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.
ही बाब असामान्यच
शुक्राचे तापमान अधिक असल्याने जीवसृष्टीसाठी ते योग्य नाही. परंतु, शुक्र ग्रहाच्या वातावरणात फॉस्फीन वायू सापडणे ही निश्चितच वेगळी गोष्ट आहे. या वायूची निर्मिती आणखी कोणत्या कारणामुळे होऊ शकते, याचाही शोध घ्यावा लागणार आहे. तसेच हा वायू जीवसृष्टीमुळेच शुक्राच्या वातावरणात आला आहे का, याचा सखोल अभ्यास करावा लागेल. - डॉ. सोमक रायचौधरी, संचालक, आयुका, पुणे
काही कोटी वर्षांनी...?
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार शुक्रावर जीवसृष्टी असू शकते. परंतु, ती कोणत्या प्रकारची असेल हे सांगता येत नाही. कारण शुक्राचे वातावरण हानिकारक आहे. काही कोटी वर्षांनंतर शुक्रावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का, किंवा काही कोटी वर्षांपूर्वी शुक्रावर असणारी जीवसृष्टी नष्ट झाली का, हा अभ्यासाचा विषय ठरू शकतो.
- डॉ. यशवंत गुप्ता, संचालक, एनसीआरए, पुणे