रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे ठेवून अपघाताच्या योजना : जीवघेण्या खोड्यांनी रेल्वे त्रस्त !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:27 PM2019-05-18T18:27:25+5:302019-05-18T18:29:46+5:30
रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे किंवा इतर वस्तु ठेवून रेल्वेगाड्यांना अपघात घडवून आणण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. खोडकर लहान मुलांसह काही जणांकडून अशाप्रकारे केले जाणारे हे कृत्य प्रवाशांच्या जीवावर बेतु शकते.
पुणे : रेल्वेमार्गावर लोखंडाचे तुकडे किंवा इतर वस्तु ठेवून रेल्वेगाड्यांनाअपघात घडवून आणण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. खोडकर लहान मुलांसह काही जणांकडून अशाप्रकारे केले जाणारे हे कृत्य प्रवाशांच्या जीवावर बेतु शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासन सतर्क झाले असून कर्मचारी व रेल्वे पोलिसांना मार्गाच्या सुरक्षेसाठी सक्त सुचना देण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एप्रिल व मे महिन्यामध्ये रुकडी ते हातकणंगले रेल्वेस्थानकादरम्यान दोन वेगवेगळ््या ठिकाणी अज्ञातांकडून मार्गावर लोखंडाचे मोठे तुकडे ठेवण्यात आले होते. लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी ही घटना घडली होती. तसेच तळेगाव-कामशेतदरम्यानही मार्गावर लोखंडी तुकडा ठेवून हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेसला लक्ष्य करण्यात आले होते. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अपघात टळल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. आप्तकालीन बे्रक लावून गाडी थांबविल्यानंतर तुकडे बाजुला काढण्यात आले.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देहूरोड स्थानकाजवळ मार्गावर ठेवलेला लोखंडी तुकडा लोकलच्या इंजिनला धडकला. पण कोणतीही दुर्घटना झाली नाही. नंद्रे-सांगली विभागात एकाच ठिकाणी लोखंडाचे तब्बल २० तुकडे आढळून आले होते. ही घटना आॅक्टोबर महिन्यात घडली होती. दि. २ डिसेंबर रोजी वाठार व आदरकी स्थानकादरम्यान काही मुलांनी रेल्वेमार्गातील फटींमध्ये लोखंडाचे तुकडे टाकले होते. त्याला धडक बसल्याने एका पॅसेंजरच्या इंजिनची सहा चाके मार्गावरून घसरली होती. याप्रकरणात पोलिसांनी काही लहान मुलांना ताब्यातही घेतले होते. त्यांच्या पालकांकडून हमीपत्र लिहून घेत सोडून देण्यात आले. गाड्यांचा अपघात करण्याचा हेतू यामागे असल्याचा संशय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.
प्रतिक्रिया :
मागील काही महिन्यांत अशाप्रकारच्या ८ ते १० घटना घडल्या आहेत. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पण काही खोडकर मुले व लोकांकडून जाणीपुर्वक असे प्रकार केले जात आहेत. रेल्वेगाड्यांना अपघात घडवून आणण्याचा हेतू दिसतो. रेल्वेकडून कर्मचारी व पोलिसांमार्फत मार्गावर सातत्याने लक्ष्य दिले जाते. पण नागरिकांकीही सतर्क राहण्याची गरज आहे. अशाप्रकारच्या घटना टाळण्यासाठी पुढे यायला हवे.
- मिलिंद देऊस्कर, व्यवस्थापक, पुणे विभाग, मध्य रेल्वे