सोमेश्वर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:56 IST2025-04-22T15:53:12+5:302025-04-22T15:56:12+5:30
साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सोमेश्वर कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्पास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार
पुणे- बालेवाडी येथे कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने नॅशनल कोजनरेशन अवॉर्ड पुरस्कार २०२४ चे वितरण शनिवारी (दि. १९) पार पडले. माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि को-जनरेशन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, संचालक राजेंद्र यादव, संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, आनंदकुमार होळकर, शैलेश रासकर, एन. एच. नायकोडी, कोजन मॅनेजर एस. एस. गावडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
को-जनरेशन संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महासंचालक संजय खताळ यांच्यासह राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, 'विस्मा'चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डॉ. संगीता कस्तुरे, प्रकाश नाईकनवरे, बारामती अॅग्रोचे राजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाची भारतीय शेतीला आवश्यकता होती. कारखान्यांनी फक्त साखरेचे उत्पादन करून परवडणार नाही. त्यामुळे बायप्रोजेक्ट करण्याची आवश्यकता आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज
को-जनरेशनचे काम उत्कृष्ट आहे. राज्य सरकार सध्या सौरऊर्जेवर मोठ्या प्रमाणात काम करत आहे. ऊसलागवड करून टनेज वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले. को-जनरेशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शेतीत करणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.