khadakwasala Vidhan Sabha 2024: खडकवासल्यात घडलं असं काही की, एकाच्या नावावर कुणी तिसराच मतदान करून गेला
By नम्रता फडणीस | Published: November 20, 2024 04:05 PM2024-11-20T16:05:44+5:302024-11-20T16:06:20+5:30
एकाच व्यक्तीचे नाव तीन मतदार केंद्रांच्या ठिकाणी, एकात नाव महिलेचे तर फोटो पुरुषाचा तर दुस-या केंद्रात त्या नावावर कुणीतरी तिसराच व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकारही शिवणे भागात घडला
पुणे : सकाळच्या बोच-या थंडीची तमा न बाळगता ८० पार केलेल्या ज्येष्ठांनी मतदानासाठी लावलेली हजेरी.. नवमतदारांसह नोकरदारांचा मतदानासाठीचा उत्साह, पुन्हा कामाच्या वेळेत बाहेर पडायला वेळ मिळेल ना मिळेल या विचाराने फिरायला आलेल्या महिलांनी सकाळच्या वेळेसच मतदानाचा बजावलेला हक्क असे काहीसे चित्र खडकवासला मतदार संघात बुधवारी ( दि. २०) पाहायला मिळाले. मात्र, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही मतदार यादीत मतदारांची नाव नसणे आणि मतदारांची नावे लांबच्या मतदान केंद्रात गेल्याने माघारी फिरावे लागणे असा काहीसा अनुभव् मतदारांना आला. तसेच एकाच व्यक्तीचे नाव तीन मतदार केंद्रांच्या ठिकाणी, एकात नाव महिलेचे तर फोटो पुरुषाचा तर दुस-या केंद्रात त्या नावावर कुणीतरी तिसराच व्यक्ती मतदान करून गेल्याचा प्रकारही शिवणे भागात घडला. शहरातील विविध भागातून काही मतदार खडकवासला मतदार संघात स्थलांतरित झाले आहेत. परंतु नव्या मतदारसंघात नोंदणीच न केल्याने काही मतदारांना जुन्याच मतदारसंघात मतदानासाठी जाण्याची वेळ आली.
खडकवासला विधानसभा मतदारसंघ शहर आणि ग्रामीण अशा दोन भागात विखुरलेला आहे. खडकवासला मतदारसंघात पाच लाख ७६ हजार ५०५ मतदार आहेत. यात प्रामुख्याने वारजे, शिवणे, धायरी, बिबवेवाडी, कात्रज, बावधन खुर्द, नऱ्हे, धनकवडी, वडगाव बुद्रुक, कोंढवे-धावडे, नांदेड, किरकटवाडी, वडगाव खुर्द हे भाग येत असून, या भागातच मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन टर्म आमदारकीचा अनुभव असलेले महायुतीचे भीमराव तापकीर , महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयूरेश वांजळे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. बुधवारी ( दि. २०) खडकवासला मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. धायरीतील सणस विद्यालय येथे सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. तर सनसिटी मधील आनंद क्षण शाळेतील मतदार केंद्रावर मतदानासाठी सकाळीच ज्येष्ठांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. इथे केवळ एकच व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती, मात्र त्या व्हिलचेअरच्या टायरची ट्यूब सारखी पड़त असल्याने ज्येष्ठांबरोबर आलेल्या व्यक्तींनाच ती ट्यूब टायरमध्ये बसवून व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता. अनेकांना व्हिलचेअरसाठी वाट पाहात बसून राहावे लागत होते. यंदा सोसायट्यांमध्येही मतदार केंद्र स्थापन करण्यात आली होती. सिंहगड रस्ता परिसरातील राजीव सोसायटीमध्ये पहिल्यांदाच केंद्र सुरू झाल्यामुळे अनेकांची मतदारांची नावे या केंद्रात होती. मात्र याची मतदारांनाच कल्पनाच नसल्याने हे केंद्र शोधायला खूप अवघड जात होते. परिणामी इतर मतदान केंद्राच्या तुलनेत या मतदान केंद्रावर पूर्णतः शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.